मिरज ः पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे चोरीला गेलेले बाळ काही तासांतच सुखरूप मिळाले. जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासह संशयितांना कमी वेळेत पकडण्याचे महत्त्वाचे काम पोलिस दलाकडून केले जात आहे. बाळ चोरीप्रकरणी मिरज सिव्हिल रुग्णालयामधील दोषींवर निश्चित कारवाई होईल. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी गुरुवारी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी चोरीस गेलेल्या बाळाची आई कविता आलदर यांची भेट घेतली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज सिव्हिलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. प्रियंका राठी, वंदना शहाणे उपस्थित होते.
पाटील म्हणाले. जिल्ह्यात क्राईम रेट कमी होण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे. मिरज शासकीय रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर कमी कालावधीत पोलिस पथकाने बाळ शोधून काढले. रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसविण्यासाठी तसेच रुग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी त्यांनी तपास पथकाचा सत्कार केला.