सांगली : पुढारी वृत्तसेवा
तासगाव तालुक्यातील एका विवाहितेस शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तसेच चाकूचा धाक दाखवत पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी पीडितेने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
फजल पटेल (वय ३६, रा. पाकिजा मशीदशेजारी, सांगली), अल्ताफ करीम (३५) आणि फजलचा भाऊ अल्फाज (पूर्ण नाव नाही) अशी संशयितांची नावे आहेत. सप्टेंबरमध्ये पीडितेला बोलावून जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले. यावेळी गाडीत फजल याचा भाऊ अल्फाज व अल्ताफ करीम होते.
यावेळी संशयित पटेल हा पीडितेला हुबळीला नेऊन विकू या, किडनी व इतर अवयव काढून घेऊ, पैसे मिळतील, असे बोलू लागला. गाडीतून सर्वजण मिरजेत आल्यानंतर संधी मिळताच पीडितेने तेथून पळ काढला.
यानंतरही संशयित पटेल याने पीडितेला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला तासगाव तालुक्यातील एका गावात राहते. तिची फजल पटेल याच्याशी ओळख झाली होती. फजल याने पीडितेला सांगलीतील घरी बोलावून घेतले. तिला शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले. शीतपेय प्यायल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. संशयितांनी तिच्यावर बेशुद्धावस्थेत अतिप्रसंग केला.
काही वेळानंतर शुद्ध आल्यानंतर आक्षेपार्ह अवस्थेत अल्ताफ हा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत असल्याचे तिला दिसले. तिने अतिप्रसंग केल्याबद्दल त्यास जाब विचारला असता, फजल याने तिला चाकूचा धाक दाखवत पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संशयित फजल याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केले.