Chaitanya Tandale murder case: चैतन्य तांदळे खून प्रकरणातील फरारी संशयिताला अटक Pudhari
सांगली

Chaitanya Tandale murder case: चैतन्य तांदळे खून प्रकरणातील फरारी संशयिताला अटक

धामणी रस्त्यावरून घेतले ताब्यात : चार दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीतील शामरावनगर येथे धारदार हत्याराने हल्ला करून चैतन्य आप्पासाहेब तांदळे या सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी फरारी असणाऱ्या राहुल जाधव (वय 25) याला सांगली शहर गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली.

सांगलीतील शामरावनगर येथे हत्यार घेऊन फिरतोस का, असे म्हणून कानाखाली मारल्याच्या वादातून चैतन्य आप्पासाहेब तांदळे या सराईत गुन्हेगाराचा चाकूने भोसकून व डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून चौघांनी खून केला होता. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी यापूर्वीच शुभम वाघमोडे, सुजल वाघमोडे आणि विनोद डांगे या तिघांना अटक केली होती. परंतु राहुल जाधव हा मात्र पसार झाला होता.

खुनाच्या घटनेनंतर राहुल जाधव याने मुंबईसह कर्नाटकातील काही शहरात आसरा घेतला होता. त्याच्या मागावर पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील गौतम कांबळे, संतोष पाटील, संतोष गळवे, सतीश लिंबळे आणि दिग्विजय साळुंखे यांचे पथक होते. परंतु तो सातत्याने पथकाला चकवा देत होता.

अखेर शनिवारी राहुल जाधव हा सांगलीतील धामणी रस्ता येथे येणार असल्याची माहिती सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला होता. अखेर राहुल जाधव हा धामणी रस्त्यावर आल्यानंतर पथकाने छापा टाकून त्यास अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT