सांगली

दानोळीतील तरुणाने वाचविले 10 जणांचे जीव

Arun Patil

सांगली/दानोळी, पुढारी वृत्तसेवा : वय जेमतेम 32… वयाच्या बाराव्या वर्षापासून तो फिटच्या आजाराने त्रस्त… गेल्या रविवारी त्याला त्रास जाणवू लागला. तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. आठवडाभराच्या उपचारानंतर त्याचा मेंदू मृत (डेड) झाला. आई, वडील, भाऊ यांना मोठा धक्का बसला. यातून सावरत कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. हृदय, यकृत, किडन्या, डोळे, त्वचा दान देत आठ ते दहाजणांना जीवदान दिले. त्यासाठी सांगली ते पुणे मार्गावर वाहतुकीचा अडथळा नको म्हणून पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला.

नितेश कुमार पाटील (वय 32, रा. दानोळी, ता. शिरोळ) असे त्याचे नाव. नितेशचे वडील शेती करतात; तर भाऊ प्रवीण पुण्याला नोकरीला आहे. प्रकृती बिघडल्याने नितेशला सांगलीत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी शक्य ते सारे केले; पण शेवटी त्याचा मेंदू मृत झाला.

कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सांगलीच्या उषःकाल रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. अजित मालाणी यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण केली.

सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली. ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने सूचना दिल्या. कराड, सातारा, पुणे पोलिस कार्यालयांशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली. हॉस्पिटलपासून चौकाचौकांत पोलिस तैनात होते. विविध रुग्णवाहिकांतून हृदय, यकृत, किडन्या हे अवयव मुंबई-पुण्याला पाठवले, तर डोळे व त्वचा सांगलीतील रुग्णालयाला दान दिले.

हृदय विमानाने मुंबईला रवाना

मुंबईतील जसलोक रुग्णालयात एका रुग्णासाठी हृदय पाठवले. सकाळी दहा वाजता रुग्णालयातून हृदय घेऊन रुग्णवाहिका कोल्हापूर विमानतळाकडे रवाना झाली. अवघ्या 38 मिनिटांत रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली. तिथून अवयव मुंबईकडे पाठवले. नितेश पाटील याच्या दोन किडन्या पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटलला पाठविल्या. यकृत रुबी रुग्णालयाकडे रवाना केले. डोळे व त्वचा सांगलीतील रुग्णालयात दान देण्यात आले. या अवयवदानामुळे आठ ते दहा रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.

आई-वडिलांना अश्रू अनावर

नितेशला लहानपणापासूनच त्रास असल्याने आई-वडिलांनी त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. त्यामुळे त्याच्या अवयवदानाचा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला. अवयव नेताना आई, वडील, भाऊ, नातेवाईक रुग्णालयात उपस्थित होते. आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT