सांगली : पुढारी वृत्तसेवा
ड्रग्ज तस्करी प्रकरणी मी स्वतः सक्त असून, हे रोखण्यासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ड्रग्ज रोखण्यासाठी पोलिसांना माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आपण वैयक्तिकरित्या बक्षीस देणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.
येथील पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या हस्ते आज (रविवारी) ध्वजारोहण समारंभ झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ड्रग्जचा प्रकार सध्या वाढत आहे. सांगली पोलिसांनी कारवाई करून टोळीचा छडा लावून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. या निमित्ताने त्यांचा मी गौरव करणार आहे. ड्रग्जच्या बाबतीत मी खूपच सक्त असून, ही तस्करी रोखण्यासाठी प्रसंगी आपण रस्त्यावर उतरून हे थांबवू. ड्रग्जचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास अशा माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपययांचे बक्षीस आपण देणार आहोत. ड्रग्जच्या समूळ उच्चाटणासाठी नागरिकांनीही पुढे येण्याची गरज आहे.
पालकमंत्री पदावरून सत्तारूढ गटात नाराजी असल्याच्या बाबतीत विचारता ते म्हणाले की, पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. पालकमंत्री पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या संदर्भात वाद असला तरी मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर आल्यानंतर या संदर्भात बैठक घेऊन ते वाद मिटवणार आहेत. यामध्ये खूप गंभीर असे काही नाही. सांगली जिल्ह्याच्या नियोजन समितीसाठी 486 कोट रुपये मंजूर आहेत. उर्वरित निधी लवकरच प्रशासनाला मिळणार आहे. 31 मार्चपूर्वी हा निधी पूर्णपणे खर्च होईल. यासंदर्भात आपण लवकरच बैठक घेऊन या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करणार आहे. प्रत्येक सोमवारी आपण सांगली जिल्ह्यात उपस्थित राहून सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.
मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात राज्यशासन सकारात्मक आहे. मनोज जरांगे यांनी उठ सुट आंदोलन करणे थांबवावे. त्यांनी प्रश्नाचा अभ्यास करावा, त्याचबरोबर तज्ञ लोकांना घेऊन सरकारबरोबर चर्चा करावी. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास नेहमी तयार आहोत.