सांगली

सांगली : कॅफेच्या अंधार्‍या खोलीत रंगतो ‘इश्काचा खेळ’

दिनेश चोरगे

[author title="स्वप्निल पाटील" image="http://"][/author]

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात कॅफेच्या अंधार्‍या खोलीत 'इश्काचा खेळ' रंगत आहे. युवकांच्या इश्काच्या खेळाला चार चाँद लावण्यात कॅफे चालकांकडून देखील हातभार लावला जात आहे. त्यासाठी कॅफे चालकांकडून तरुण आणि तरुणींना 'विश्रांती' घेण्यासाठी 'खास' सोयदेखील करण्यात येत आहे.

ऐन तारुण्यात आलेल्या तरुण आणि तरुणींना एकमेकांविषयी आकर्षण असणे स्वाभाविक आहे. महाविद्यालय, समाजमाध्यमातून तरुण आणि तरुणींची ओळख होते. परंतु त्यांना गप्पा मारण्यासाठी एकांत मात्र मिळत नाही. त्यांची ही अडचण हेरून, पैसा मिळविण्यासाठी काहीजणांनी कॅफेच्या नावाखाली गोरखधंदा सुरू केला आहे. शहरात अनेकांनी कॉफी शॉपच्या नावाखाली कॅफे सुरू केले आहेत. या ठिकाणी येणार्‍यांना कॉफी तर मिळतेच, शिवाय फास्टफूडची देखील सोय करण्यात आलेली असते. तसेच जर कॉफी एकांतात शेअर करायची असेल, तर त्याची देखील सोय या कॅफे चालकांकडून करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर मात्र कॅफेत बनविलेल्या कंपार्टमेंटमध्ये बसून एकमेकांना 'निवांत क्षण' घालविता येतात.

काही तरुण, तरुणींना 'विश्रांती' घ्यायची असेल, तर त्याची देखील 'खास' सोय या कॅफे चालकांकडून करण्यात आलेली आहे. कॅफेमध्येच अडगळीच्या खोलीमध्ये बेड, झिरो बल्ब लावून एक माहोलच कॅफे चालकांकडून तयार करण्यात आला आहे. यातून कॅफे चालकांची कमाई देखील जोमात आहे. अर्थात काही जणांचे खिसे गरम केल्याशिवाय तरी हे शक्य नाही. एकांत मिळत असल्याने जोडप्यांची पावले देखील आपसुकच या कॅफेकडे वळत आहेत. याचा गैरफायदा देखील उठविला जात असल्याचे दिसून येते. ऐन तारुण्यात प्रेमाच्या रंगाला चार चाँद लावण्यासाठी उत्सुक असणार्‍या अनेकांचा या कॅफेत पाय घसरत असल्याचे देखील आता समोर आले आहे.

कॅफेमध्ये शहरासह ग्रामीण भागात येणार्‍या जोडप्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी बसण्यास टेबल, खुर्ची, तसेच काही विशेष खोल्यांमध्ये बेडची देखील सोय करण्यात आलेली असते. कॅफेमध्ये या सुविधा कशासाठी करण्यात येतात, हे सर्वश्रुत आहे. कॅफेत सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने अनेकांचा कॅफेकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआमपणे असा गोरखधंदा काहीजणांनी चालविला आहे. अशाच तीन कॅफेंची सांगलीत तोडफोड करण्यात आली.
जिल्ह्यात अनेक कॅफेमध्ये तरुण आणि तरुणींचा इश्काचा खेळ रंगत आहे. याच कॅफेमध्ये त्यांच्या इश्काच्या खेळाला चालकांकडून चार चाँद लावले जात आहेत. याला आता कोठेतरी आळा बसण्याची गरज आहे. आता कॅफेत बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. कॅफेमध्ये अन्य कोणती मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी आता सर्व कॅफेंची झाडाझडती घेऊन त्यांना टाळे ठोकण्याची गरज आहे.

कॅफे म्हणजे लॉजमधून पळवाट…

अनेक जोडपी भेटण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी लॉजचा वापर करीत होती. लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी ओळखपत्र मागितले जाते. परंतु अनेकांना ओळख लपवून भेटण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण कॅफेचाच पर्याय निवडतात आणि याचाच गैरफायदा घेऊन काही तासासाठी अवाच्या सवा दर त्यांच्याकडून आकारून त्यांची लूट करण्यात येत आहे.

खुलेआम गोरखधंदा

सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम कॅफे सुरू आहेत. परंतू आता या कॅफेमध्ये काय चालते, येथे कोण कोण येतात, याची कल्पना पोलिसांना नसावी का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात असे कॅफे चालविण्यासाठी अनेकांचे खिसे गरम करावे लागतात, हे मात्र निश्चित. त्यामुळे कॅफे चालकांना देखील कारवाईची भीती नसावी का? कॅफेच्या नावाखाली सुरू असणारा हा गोरखधंदा बंद होण्याची आवश्यकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT