शशिकांत शिंदे
सांगली ः प्रतिकूल हवामानामुळे गेल्यावर्षी द्राक्षाचे उत्पादन कमी झाले. परिणामी बेदाणा उत्पादनही 50 हजार टनांनी घटले. त्यामुळे इतिहासात यंदा पहिल्यांदाच बेदाण्याला प्रतिकिलोला तीनशे ते साडेचारशे रुपये असा चांगला दर मिळत आहे. भारतात चांगला दर मिळत असल्याने अफगाणिस्तानमधून सुमारे 900 टन बेदाणा 45 कंटेनरमधून भारतात येणार आहे. हा बेदाणा भारतात आल्यास देशातील बेदाण्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या बेदाण्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाने या आयातीस तीव्र विरोध केला आहे. येणार्या बेदाण्यावर आयात कर आकारण्यात यावा, त्याची रेसीड्यू तपासणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशी मागणी जीएसटी विभागाकडे केली आहे.
देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात होते. विशेषतः सांगली, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये हे उत्पादन होते. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र असून या भागातील शेतकरी मार्केटिंगवर अधिक भर देतात. सांगली व परिसरातील सोलापूर, सातारा, विजापूर या जिल्ह्यातील शेतकरी मात्र मार्केटिंगबरोबरच बेदाणा उत्पादन मोठ्या प्रमाणात करतात.
राज्यात गेल्या वर्षी सातत्याने पाऊस झाला. प्रतिकूल हवामानामुळे अनेकांच्या द्राक्षबागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन घटले. अनेक शेतकर्यांनी द्राक्षाला चांगला दर असल्याने बेदाणा करण्याऐवजी बाजारपेठेत द्राक्षाची विक्री केली. परिणामी यंदा बेदाण्याचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी साधारणपणे एक लाख 70 हजार टन बेदाणा उत्पादन होत असते. यंदा एक लाख तीस हजार टनापर्यंत उत्पादन झाले. त्यापैकी सध्या 30 हजार टन बेदाणा शिल्लक आहे. यातील 70 टक्के बेदाणा हा शेतकर्यांचा, तर 30 टक्के बेदाणा व्यापार्यांचा आहे. गेल्या वर्षी बेदाण्यास प्रतिकिलोला सरासरी 130 ते 200 रुपये दर होता. यंदा तो 300 ते 450 रुपये किलोपर्यंत आहे. वाढलेले दर लक्षात घेऊन काही व्यापार्यांनी नेपाळमार्गे तस्करी करीत चिनी बेदाणा उत्तर भारतात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या बेदाण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्याचे कारण पुढे करीत काही व्यापार्यांनी बेदाणा दर पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, द्राक्ष बागायतदार संघाने ही बाब चव्हाट्यावर आणली. त्यामुळे हा बेदाणा थांबविला गेला.
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या चार महिन्यांत रक्षाबंधन, श्रावण, गणपती, गोकुळाष्टमी, दसरा, दिवाळी हे सण आहेत. या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यंदाच्या मे महिन्यात सातत्याने पावसाळी व ढगाळ वातावरण होते. या कालावधीत द्राक्षाची काडी पक्व होत असते. मात्र पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने यंदाही द्राक्षाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. द्राक्षाचे उत्पादन कमी झाले तर बेदाण्याचे उत्पादनही घटणार आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षे बेदाण्याला चांगले दर राहतील, असा अंदाज आहे. ही बाब लक्षात घेऊन अफगाणिस्तानमधील बेदाणा भारतात आणण्याचा घाट काही व्यापार्यांनी घातला आहे. सुमारे 45 कंटेनर बेदाणा हा भारतातील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात राज्यात येणार आहे.
याबाबतची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जीएसटी विभागाकडे धाव घेत ही आयात थांबवावी. अफगाणिस्तानमधून येणार्या मालावर आयात कर नाही. तो आकारण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिवाय येणार्या बेदाण्याच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
इराण, चीनमधून येणार्या मालावर भारतात आयात कर लावण्यात येतो. अफगाणिस्तानातील मालावर मात्र आयात कर नाही. त्यामुळे चीन, इराणमधील बेदाणा अफगाणमार्गे भारतात आणण्याचा घाट घातला जात आहे. त्याचा परिणाम देशातील बेदाणा दरावर होण्याचा धोका आहे.
द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याने बेदाण्याचे उत्पादनही कमी आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. पुढील वर्षीही द्राक्षाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे. वाढते दर लक्षात घेऊन काही व्यापार्यांनी अफगाणिस्तानमधील बेदाणा आयात करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्याला बागायतदार संघाचा विरोध आहे. या बेदाण्यावर सरकारने कर आकारावा. त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ