कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार धडक दिल्याने तालुक्यातील घाटमाथ्यासह ढालगावपूर्व भागात आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागातही शेतीत चांगला ओलावा निर्माण झाला. तसेच उत्कृष्ट वाफसा असल्याने तालुक्यातील शेतकर्यांनी सरासरी 89 टक्के खरीप पेरणी पूर्ण केली आहे.
खरीप पेरणी हंगामात बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन आदींसह प्रमुख कडधान्यातील गळीत कडधान्य पेरणीस शेतकर्यांनी अधिक प्राधान्य दिल्याचे पाहावयास मिळत आहे. यावर्षी कडधान्याचे उत्पादन अधिक झाल्यास दोन वर्षांचा कडधान्याचा कोटा पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
सध्या कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पूर्णतः प्रायोगिक तत्त्वावर शेतीव्यवसाय करण्यास प्राधान्य देत असल्याने पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत आहे. पीक उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पेरणीपश्चात तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे, शेतकर्यांना बीज प्रक्रियेचे होणारे फायदे या विषयावर उल्लेखनीय माहिती देऊन मका पिकाबरोबरच बाजरी पीक पध्दत राबविल्यास सर्वात जास्त उत्पादन प्राप्त कसे होते, याची माहिती दिली. यावर्षी खरीप पेरणी हंगाम उत्कृष्ट पध्दतीने झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शेतकर्यांना कडधान्य उत्पादनाचा मोठा लाभ मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.