सांगली : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज, शुक्रवार, २३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी सांगली जिल्ह्यात एकूण १५९ मतदान केंद्रे असून ८८ हजार ७० मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रे असून ८ हजार ६२ मतदार आहेत. यासाठी कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. त्यांची मतदान केंद्रात आवश्यक व्यवस्था केली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावरून मतदान पथकांना निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतपत्रिका वैध ठरावी, या उद्देशाने निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मतदान करावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत उपस्थित होत्या.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने आवश्यक व पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघांसाठी एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई याप्रमाणे ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे १ हजार ६१४ मतदान कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबररोजी पुणे येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त ओळख पटविण्यासाठी १० पैकी एक पुरावा आवश्यक...
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य/ केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित मूळ पदवी, पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र.
असे करा मतदान
मतपत्रिकेबरोबर दिलेल्या जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन वापरू नका. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहा. १ आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या. तो एकाच वेळी वापरता येईल. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा घातलेला आहे आणि तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची खात्री करा. पसंतीक्रम फक्त १, २, ३ अशा आकड्यांत लिहा. एक, दोन, तीन असे शब्दांत लिहू नका. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 यांसारख्या आंतरराष्ट्रीय रूपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रूपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रूपात देता येतील.
पदवीधर मतदारसंघ : पक्षीय लढत
डॉ. स्मिता जाधव - भाजप
हर्षदा देशमुख-जाधव - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
सुनील मोदी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिक्षक मतदारसंघ : तिरंगी लढतीकडे लक्ष
कौस्तुभ गावडे - भाजप
जयंत आसगावकर - काँग्रेस
सचिन सानप - अपक्ष