मिरज : मिरज किल्ला भागात कल्याण चालुक्यकालीन आणि 875 वर्षांपूर्वीचा जुना कन्नड शिलालेख सापडला. येथे संशोधन करणार्या तरुणांना हा शिलालेख सापडला आहे. या शिलालेखावरून मिरजेवर जगदेकमल्ल द्वितीय या राजाचे राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे.
संशोधक मधुकर हक्के म्हणाले, या संशोधन कार्यात डॉ. सुजाता शास्त्री, महेश कदम, राजाराम जाधव यांची मदत मिळाली. मिरज किल्ल्याच्या आत किल्ल्याच्या उतरतीला दक्षिण दिशेला सब डिव्हिजन ऑफिसच्या दक्षिणेला खंदकाच्या जवळील भागात हा नवीन कन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. प्रथम या शिलालेखाकडे मनोज उदगावे यांची संशोधकदृष्ट्या चिकित्सक नजर पडली. पुढील संशोधन व विश्लेषणासाठी त्यांना कृष्णा गुडदे यांनी मदत केली. या शिलालेखाचे वाचन डॉ. देवरकोंडा रेड्डी यांनी करून दिले. या सर्वांच्या प्रयत्नांनी मिरजेच्या प्राचीन इतिहासाची आणखी एक माहिती उजेडात आली आहे.
या शिलालेखाच्या वरील भागावर शिवलिंग, शैव मुनी, सूर्य, चंद्र हे कोरलेले आहेत. त्याखाली 8 ओळींचा कन्नड मजकूर आहे. शिलालेखाची उंची 56 से.मी., रुंदी 48 से.मी., जाडी 13 से.मी. आहे. शिलालेखामध्ये कल्याणीचा चालुक्य राजा जगदेकमल्ल द्वितीय याची राजप्रशस्ती आली आहे. त्यानंतर त्या सामंत याची प्रशस्ती आली आहे. मात्र त्या शिलालेखाखालील भाग तुटलेला आहे. त्यामुळे या शिलालेखातील अधिक माहिती मिळू शकत नाही.
“स्वस्ति समस्त भुवनाश्रय पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज परमेश्वर परमभट्टारक सत्याश्रय कुळतिलक चालुक्या भरणं श्रीमंज्जगदेकमल्ल विजयराज्याभिवृध्दि प्रवर्ध्दमान माचंद्रार्क्क तारं सलुत्तमिरे तत्पाद पद्मोपजीवि समधिगत पंचमहाशब्द महामण्डळेश्वरं सौर्य्यकंठीरव तिभाळ सामन्त जन”
या राजाच्या नेहमीच्या प्रसिध्दीनीयुक्त आलेल्या प्रसिध्दीनंतर या चालुक्य राजा जगदेकमल्ल द्वितीय याचे राज्य असल्याचे सांगितले आहे. याचे सतत वाढत जाणारे विजयी राज्य चंद्र, तारे असेपर्यंत असेच राहो. या राजाच्या पायाशी राहून उपजीविका करणारा, ज्याला राजाकडून पंचमहाशब्द या शब्दाचा अर्थात वाद्यांचा मान मिळाला आहे, असा, जो जगदेकमल्ल राजा अंतर्गत महामंडलेश्वर आहे, ज्याच्या शौर्यमाळा गळ्यात आहे, असा (अनामिक) प्रांतिक राजा, जो जगदेकमल्ल याचा सामंत आहे. याच्या प्रांतात हे शासन अर्थात शिलालेख स्थापन झाला.
जगदेकमल्ल द्वितीय याने इ. स. 1138 ते 1152 या कालावधीत राज्यकारभार केला. या शिलालेखावरून या राजाचे राज्य मिरज भागावर होते व त्याच्याअंतर्गत सामंत राजा येथून राज्यकारभार करत होता हे स्पष्ट होते. शिलालेखात तिथी, कालनिर्देश नाही, मात्र अंदाजे इ.स. 1140 च्या जवळपासचा असावा. यावेळी मंगळवेढ्याचे कलचुरी व कोल्हापूरचे शिलाहार यांच्या सीमा निश्चिती करताना मिरज चालुक्यांच्या अंतर्गत होते, हे स्पष्ट होते, असे मनोज उदगावे यांनी सांगितले.