सांगली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगांना घरकुल देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील 10 तालुक्यांतून 123 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी तरतूद रकमेपेक्षा जादा प्रस्ताव दाखल झाल्याने सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. या सोडतीतून 87 दिव्यांगांना घरकुलाची लॉटरी लागली.
दिव्यांगांसाठी घरकुल योजनेसाठी सुमारे 1 कोटी चार लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एका घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते, त्यासाठी पात्र लाभार्थींकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. समाजकल्याण विभागाकडे 115 प्रस्ताव दाखल झाले होते. मिरज, पलूस, जत आणि आटपाडी तालुक्यातून दिव्यांग घरकुलांसाठी जादा प्रस्ताव दाखल झाले होते. त्यामुळे घरकुलासाठी लाभार्थींची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली आहे.
दिव्यांग घरकुलासाठी 87 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. याशिवाय 8 लाभार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. 87 पैकी एखाद्या लाभार्थीने घरकुल नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील दिव्यांग लाभार्थीस घरकुल मिळणार आहे. घरकुल मंजूर झालेल्या संबंधित लाभार्थींना लेखी पत्र समाजकल्याण विभागाकडून पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहे. लाभार्थींना पहिला हप्ता 15, दुसरा 45, तिसरा 40 आणि चौथा हप्ता 20 हजार याप्रमाणे मिळणार आहे, यापैकी पहिला हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.