विटा : दोन डिसेंबर रोजी होणार्या विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात भाजपने बाजी मारली. गुरुवारी आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुकांनी मुलाखती दिल्या. नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. येथील मायणी रस्त्यालगतच्या आदर्श महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये या मुलाखती झाल्या.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि माजी आमदार सदाशिव पाटील हे प्रथमच आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासमवेत सार्वजनिक एकत्र आलेले दिसले. त्यामुळे माजी आमदार पाटील गटातील कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर आनंद होता. कारण, गेल्या काही वर्षांत पडळकर बंधूंनी विटा शहर आणि खानापूर तालुक्यात स्वतंत्र भाजपची बांधणी करण्यास सुरुवात केली होती. या दोन्ही नेत्यांनी भाजपचे स्वतंत्र कार्यक्रम राबविले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांत पाटील आणि पडळकर गटाच्या युतीबाबत संभ्रमावस्था होती. पण मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार पडळकर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या एकत्रित निवडणुका लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण चार जणांच्या मुलाखती झाल्या, तर नगरसेवक पदासाठीच्या एकूण 60 जणांनी मुलाखती दिल्या. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने दोन स्वतंत्र कक्षात पक्षाच्यावतीने विभागून मुलाखती घेण्यात आल्या.
दरम्यान, आणखी 17 इच्छुक उमेदवार आहेत, परंतु आज ते परगावी असल्याने त्यांचे प्रतिनिधी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती दुसर्या टप्प्यात घेण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, माजी नगरसेवक अनिल बाबर, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, भारतीय ओबीसी मोर्चाचे संग्राम माने आदी पदाधिकार्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.