जत : जाडरबोबलाद (ता. जत) येथे शेतातून 52 हजार किमतीची तुरीची 13 पोती चोरट्याने लंपास केली. याबाबत शेतकरी सिद्धराया चंद्रशेखर रवी (रा. जाडरबोबलाद) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धराया रवी यांनी शेतातील तुरी शेतात ठेवली होती. प्रत्येकी 80 किलो वजनाची एकूण 18 पोती भरून ठेवली होती. यापैकी 13 पोती चोरट्याने लंपास केली. 50 रुपये प्रति किलो दराने अंदाजे 52 हजार किंमतीचा माल 9 डिसेंबररोजी रात्री 10 नंतर ते 10 डिसेंबररोजी सकाळी 8 या वेळेत चोरट्याने लंपास केला.
शोधाशोध करूनही चोरट्यांबाबत माहिती न मिळाल्याने त्यांनी जत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. चोरीस गेलेला माल अद्याप मिळून आलेला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नरळे करत आहेत.