तासगाव : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण विमान उड्डाण व्यवस्था कोलमडून गेली. अशातच तासगाव तालुक्यातील 45 प्रवासी माउंट अबू, राजस्थान, साबरमती गुजरात या ठिकाणच्या सहलीवरून परत येऊन अहमदाबाद येथील विमानतळावर अडकून पडलेले होते. याची माहिती मिळताच आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी त्यांना सुखरूप परत आणण्याची व्यवस्था केली.
तासगाव तालुक्यातील हे सर्वच प्रवासी गुरुवारी दुपारी 2 वाजता अहमदाबाद येथून पुण्याला विमानाने येणार होते. अहमदाबाद - लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावर सर्व वाहतूक व्यवस्थाच विस्कळीत झाली. विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. हे समजताच तासगाव तालुक्यातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी याची माहिती आमदार रोहित पाटील यांना दिली. आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी लगेच नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. तासगावसह महाराष्ट्रातील आणखी काही प्रवासी अडकून पडले आहेत का? याबाबत माहिती घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली. एवढ्यावरच न थांबता तासगाव येथील विमानतळावर अडकून पडलेले प्रवासी आणि नातेवाईकांशी संपर्क साधून दिलासा दिला. त्यांना अहमदाबादहून थेट तासगावपर्यंत सुखरूप आणण्याची व्यवस्था केली. यामुळे अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट आणि विमानतळावर झालेली गडबड पाहून धास्तावलेल्या प्रवाशांच्या जिवात जीव आला.
काही दिवसापूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथील कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अडचणीचा प्रसंग आला होता. तेव्हाही आमदार रोहित पाटील यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींशी संपर्क करत सहलीस गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करून त्यांना सुखरूप कवठेमहांकाळ येथे आणले होते. फेब्रुवारीत औरंगाबाद येथे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या मतदारसंघातील रुग्णास तातडीने उपचार मिळावेत यासाठी हलविण्याची सोयही केली होती.