सांगली : जगभरात आहेत सहा हजार भाषा. पैकी भारतात सापडतात पंधराशेपर्यंत भाषांची नावे. जगातील 30 भाषांत लागतो मराठीचा क्रमांक. आता या विधानावर केवळ नाचून काय उपयोग? मराठीच्या बोलीभाषा आहेत सुमारे साठ. त्यातील चाळीस भाषा मृत्यूपंथाकडे चाललेल्या आहेत. असे कोण म्हणते? तर अभ्यासक मंडळी. जगात आहेत सुमारे सहा हजार भाषा. त्यातील चार हजारांवर भाषा होतील नष्ट. असे कोण म्हणते? तर अभ्यासक. आणि काय म्हणतात अभ्यासक? तर ते म्हणतात चार हजारांवर भाषांत भारतातील सुमारे सहाशे आहेत. बाप रे. बॅड न्यूज.
आपल्याला अवगत भाषेशिवाय अन्य भाषांवर, उपभाषा, बोलींवर, अन्य भाषिक संस्कृतीवर आपण प्रेम करतो का? आपण नवीन भाषा शिकण्याचा, किमान बोलायला तरी शिकण्याचा प्रयत्न करतो का? मराठी किती प्रकारे बोलली जाते? आपल्याला माहिती असते का? आपण आपल्या भाषेवर, बोलीभाषांवर जीवापाड प्रेम करतो का? प्रेम केले तर प्रपंच... तर विस्तार...तर जतन आणि संवर्धन. तात्पर्य काय तर वाचा. लिहा. बोला. हे सतत करा. भाषा वापरा नाहीतर गंज चढून हमखास अपमृत्यू. कितीतरी भाषा नामशेष झाल्या, याचा हिशेबच कोणाजवळच नाही, असे भाषातज्ज्ञांचे म्हणणे.
काही बोली बोलणारे काही लोकच आता शिल्लक राहिलेत. त्यांची जीवनयात्रा संपली की संबंधित बोलीभाषेचा चित्रपट समाप्त. एका खजिन्याचा, वैभवाचा दि एंड. बोलीभाषांचे मूळ रूपडे पुस्तकांपेक्षा बोलण्यात, व्यवहारात, जीवनशैलीचा भाग होण्यात खरे सजेल. याचे कारण भाषा काय शब्दांचे केवळ इमल्यावर इमले चढवलेली इमारत नसते. भाषेत भेटतो चराचरासह मानवी समुदाय. सर्वेक्षणामुळे दस्तऐवजीकरण होते ते अनमोलच. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ च्या कामाला सलामच. त्यात भाषेचा खेळ, जीवाशिवा असा भेटतो का? पाहायला मिळतो का? पर्यावरणाच्या क्षतीच्या परिणामाची चर्चा 1964 नंतर जगभर सुरू झाली, त्या धर्तीवर भाषिक पर्यावरणाची जाणीव सर्वदूर सजग करायला पाहिजे. साने गुरुजींच्या आंतरभारतीसारख्या प्रयोगांचा विचार व्हावा. भाषा, बोलीभाषा, भाषेच्या रूपांचे जतन, संवर्धन करण्याचे आव्हान जिकीरीचेच. माहिती-तंत्रज्ञानाच्या थयथयाटी मंचाच्या जमान्यात काही एक अनमोल असे दस्तऐवजीकरण तरी झाले.