अपघातग्रस्त दुचाकी. Pudhari
सांगली

Sangli Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

शेळकेवाडीजवळ घटना : पती गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

नागज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंद्राबाई हणमंत शेळके (वय 66) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती हणमंत विठोबा शेळके (वय 70, रा. समतानगर, मिरज; मूळ गाव काळूबाळूवाडी-जुनोनी, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत शेळके आणि चंद्राबाई शेळके हे पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच 10 डीयू 4226) सांगलीच्या दिशेने निघाले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शेळकेवाडी येथील पुलावर मागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत शेळके यांची दुचाकी सुमारे दोनशे फूट फरफटत गेली. या अपघातात चंद्राबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हणमंत शेळके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली असून, हवा,दार पी. एस. स्वामी आणि एस. ए. व्हसमाळे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT