Fraud Case file photo
सांगली

Sangli Fraud case: वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून 40 लाखांना गंडा

मंत्रालयात ओळखीचा बनाव; जत पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जत : मंत्रालयात ओळखीचा बनाव करून वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत येळवी (ता. जत) येथील एका कुटुंबाची तब्बल 40 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रणजित तुकाराम कुंभार (रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व नीशा सगरे (पूर्ण पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही कुंभार याने तालुक्यातील एका कुटुंबाची 40 लाखाची फसवणूक केली होती. त्याच्याविरोधात हा दुसरा गुन्हा आहे.

याबाबत आनंदा सुखदेव आवटे (रा. येळवी) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. एप्रिल 2023 मध्ये रणजित कुंभार याने आवटे यांच्याशी संपर्क साधून, येळवी परिसरात जमीन खरेदीसाठी मदत मागितली होती. यावेळी त्याने स्वतःचे मंत्रालयात संबंध असल्याचे सांगून आपण मंत्रालयातील विविध परवानग्यांची कामे करीत असल्याचे सांगितले.

दरम्यान, आवटे कुटुंबाने वाईन शॉप सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याने शासनाकडून परवाना मिळवून देतो, असे सांगून कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर ‌‘वाईन शॉप‌’ नावाने परवान्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत मंत्रालयातील अधिकारी, डिपॉझिट, कर, कार्यालयीन खर्च, कर्ज प्रक्रिया आदी कारणे पुढे करून वेळोवेळी आवटे कुटुंबाकडून फोन-पे तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले. रणजित कुंभार याच्या फोन-पे खात्यावर 14 लाख 64 हजार रुपये, तर त्याच्या सांगण्यावरून नीशा सगरे हिच्या स्कॅनरवर 50 हजार रुपये पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

परवाना मिळत नसल्याने संशय निर्माण झाल्यानंतर आवटे कुटुंबाने चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT