इस्लामपूर : मे, जून महिन्यात पडलेल्या पावसाने वाळवा तालुक्यात खरीप हंगामाचा खोळंबा झाला. तालुक्यात केवळ 9 हजार 11 हेक्टर म्हणजेच 38 टक्के पेरा झाला आहे. भुईमूगाची सर्वाधिक 3 हजार 799 हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. यावर्षी तालुक्यात 23 हजार 555 हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे.
कित्येक वर्षांनंतर मे महिन्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. मशागती लांबल्या. काहीं शेतकर्यांनी गडबडीने शेत तयार करून घेतले. मात्र, सखल भागातील शेतात अजूनही पाणी साचून राहिले आहे. परिणामी बहुसंख्य गावात नांगरलेल शेत मशागती शिवाय पडून आहेत. शेताला वापसा आल्याशिवाय मशागती करू शकत नाही. त्यामुळे पाऊस होऊनही पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात खरीप पिकांची झालेली लागवड हेक्टरनिहाय अशी भात- 402 , ज्वारी 2, मका 1, भुईमूग 3799, सोयाबीन 4807, तेलबियाचा 41.07, हळद 242 हेक्टरमध्ये पिकांची लागवड झाली आहे. तसेच तीळ, सूर्यफूल, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद आणि इतर कडधान्याचा अजून पेरा झाला नाही. 2025 - 2026 या गळीत हंगामात तालुक्यात 33 हजार 565 हेक्टर ऊसाचे क्षेत्र उपलब्ध आहे.