शेतकरी  Pudhari
सांगली

Sangli News| पहिल्या यादीत ३७,८६५ शेतकरी कर्जमाफीस पात्र

जिल्हाधिकारी मैनाक घोष; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील ३७ हजार ८६५ शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (बायोमेट्रिक/थम पडताळणी) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी केले आहे.

डॉ. घोष म्हणाले, पात्र शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. दोन लाखांवरील कर्जदारांनी दोन लाखांवरील अतिरिक्त रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यातील सर्व विकास संस्था (सोसायटी) व ग्रामपंचायतींच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ही पहिली यादी असून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. या कर्जमाफीचा लाभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका व व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या सभासदांना मिळणार आहे.

शासनाच्या कर्जमाफीची प्रत्यक्ष प्रक्रिया ७ जूनरोजी शासकीय लेखापरीक्षकांच्या प्रशिक्षणाने सुरू झाली होती. जिल्हा विशेष लेखापरीक्षक भारत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय लेखापरीक्षकांनी ८ ते २५ जूनदरम्यान या याद्यांची पडताळणी करून त्या प्रमाणित केल्या आणि ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर केल्या होत्या.

‘याद्या वस्तुनिष्ठ व परिपूर्ण’

कर्जमाफीच्या याद्या तयार करण्यासाठी शासनाने सहकार विभागाला विशेष संगणकीय प्रणालीची जबाबदारी दिली होती. या प्रणालीमध्ये माहिती भरल्यानंतर शासनाच्या निकषांमध्ये बसणारी नावेच आपोआप पात्र ठरत होती. निकषांत न बसणारी नावे ही प्रणाली स्वीकारत नसल्यामुळे तयार झालेली यादी पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि त्रुटीमुक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT