सांगली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल 96.09 टक्के लागला. 36 हजार 989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांना आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, डिप्लोमा, आयटीआय अशा विविध शाखांमध्ये सुमारे 51 हजार 713 प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत क्षमता जास्त आहे. मात्र ठराविक शाखेत आणि कॉलेजमध्ये प्रवेश हवा, या हट्टामुळे प्रवेश कोंडी होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून दहावीत उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण 131 अनुदानित संस्था आहेत. या संस्थांमध्ये कला शाखेत सुमारे 13 हजार 640, वाणिज्य शाखेत 8 हजार 120, विज्ञान शाखेत 4 हजार 440, संयुक्त 2 हजार 140 अशी प्रवेश क्षमता आहे, तसेच विनाअनुदानित 49 संस्था आहेत. यासाठिकाणी कला शाखेत 2 हजार 240, वाणिज्य शाखेत 5 हजार 500, विज्ञान शाखेत 2 हजार 280, संयुक्तमध्ये 200 अशी प्रवेश क्षमता आहे. त्याचबरोबर स्वयं अर्थसहाय्यित 65 संस्था जिल्ह्यात आहेत. कला शाखेत 720, वाणिज्य शाखेेत 4 हजार 240, विज्ञान शाखेत 620 आणि संयुक्त 160 अशी प्रवेश क्षमता आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वंयअर्थसहाय्यित अशी एकूण 245 संस्था आहेत. त्यामध्ये एकूण सुमारे 44 हजार 300 अशी प्रवेश क्षमता आहे.
जिल्ह्यात शासकीय आयटीआयमध्ये एकूण सुमारे 1 हजार 80 प्रवेश क्षमता आहे. तसेच विनाअनुदानित खासगी आयटीआयमध्ये सुमारे 2 हजार 640 प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात खासगी आाणि शासकीय आयटीआय संस्थेत 3 हजार 720 प्रवेश क्षमता आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अशा विविध इंजिनिअरिंगच्या कोर्सेसची सुमारे 15 कॉलेज आहेत. या सर्व कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश क्षमता सुमारे 3 हजार 693 आहे. विद्यार्थी आणि पालकांचा अजूनही डिप्लोमाकडे ओढा आहे. त्यामुळे नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश कोंडी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत अकरावीसाठी प्रवेश क्षमता जास्त आहे. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती हे धोरण आहे. त्यामुळे शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला नाही तर शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.
आठ ते दहा वर्षांपूर्वी वाणिज्य, विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा होता. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि पालकही नव्या करिअर संधी शोधत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे महाविद्यालय बंद होण्याचा धोका आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि कॉलेजमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 38 हजार 722 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. 38 हजार 492 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 36 हजार 989 उत्तीर्ण झाले. मात्र विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे 14 हजार जागा रिक्तच राहण्याचा धोका आहे.