जत : विषबाधा झालेले रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. Pudhari Photo
सांगली

जत तालुक्यात भगर पिठातून 326 जणांना विषबाधा

पुढारी वृत्तसेवा

जत/माडग्याळ : पुढारी वृत्तसेवा

जत तालुक्यात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महिलांनी फराळासाठी वापरलेल्या भगर अर्थात वरीच्या पिठातून तब्बल 326 महिलांना विषबाधा झाली. ही भगर जत येथील जगदंबा ट्रेडर्समधून किराणा दुकानदारांनी खरेदी केली. त्यामुळे तालुक्यातील 23 गावात विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने या दुकानावर कारवाई केली.

महिलांना शुक्रवारी रात्रीपासून त्रास होऊ लागल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय व पाच आरोग्यवर्धिनी केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्‍या महिलांची संख्या वाढतच होती. दिवसभरात 76 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. खैराव, कोणीकोणूर, वाळेखिंडी, माडग्याळ, अचकनहळ्ळी, संख, व्हसपेठ, कोळीगीरी, नवाळवाडी, शेगाव, सिंगनहळ्ळी, वळसंग यासह 23 गावांत विषबाधा झाल्याचे स्पष्ट झालेे. शनिवारी सकाळी आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रात 105 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. दुपारनंतर 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 31 रुग्णांवर उपचार सुरू होते. सद्यस्थितीत सर्व रुग्ण व्यवस्थित आहेत.

तालुक्यातील आतापर्यंत 326 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. भगरीच्या निकृष्ट पिठामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील 31 जण सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्यांनी भगर व भगरीचे पीठ खाल्ले आहे, त्यांनी लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.
- डॉ. हेमा क्षीरसागर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी.

शनिवारी दुपारी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी जगदंबा ट्रेडर्सची पाहणी करून दुकानातील भगर व भगरीचे उपपदार्थ तयार करून खाऊ नये, असे आवाहन केले. तसेच अन्न भेसळ विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी जगदंबा ट्रेडर्सवर छापा टाकून भगरीचा साठा जप्त केला. त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. चाचणी अहवालानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे तहसीलदार धानोरकर यांनी स्पष्ट केले. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे त्यांनी कळविली आहे.

जत तालुक्यात अनेक गावांतील लोकांना विषबाधेची लक्षणे दिसून येत आहेत. याबाबतची माहिती मिळताच प्रभारी अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी छापा टाकून भगरीचे नमुने घेतले आहेत. संपूर्ण साठा सील केला आहे. अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे.
- नीलेश मतारे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सांगली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT