मिरज : मिरजेतील रेल्वे हद्दीतील इंडियन ऑइल डेपोलगत असणारी कुष्ठरोगी वसाहतीमधील 21 घरे रेल्वे प्रशासनाने जमीनदोस्त केली. पुनर्वसन न करता घरे हटवण्यात आल्यामुळे 21 कुष्ठरोगी कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे.
मिरज-सांगली रस्त्यावरील इंडियन ऑईल डेपोलगत गेल्या 40 वर्षांपासून इंदिरानगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमध्ये कुष्ठरोगी राहण्यास आहेत. रेल्वेची जागा मोकळी करण्यासंदर्भात रेल्वेने त्यांना वारंवार नोटीस दिली होती. राज्य शासनाने पंढरपूर रस्त्यावर मालगाव हद्दीत कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित असणार्या जमिनीवर पुनर्वसन करावे, अशी मागणी केली होती. मात्र या पुनर्वसनाकडेे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात या जागेवरील अतिक्रमणे असलेली 21 घरे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. पुनर्वसन न करता कुटुंबांची घरे पाडण्यात आल्यामुळे 21 कुष्ठरोगी कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे.