सांगली

सांगली : ड्रग्ज, मनी लाँडरिंगची भीती घालून 20 लाखांचा गंडा

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बनावट आधारकार्ड वापरून परदेशात ड्रग्ज पाठविण्यात येत आहे. तसेच मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात असणार्‍या व्यक्तीसोबत जॉईंट अकाऊंट असून, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुमचे बँक खाते सील करावे लागेल, असे सांगून अनिकेत अरुणकुमार कदम या सॉफ्टवेअर इंजिनियरला तब्बल 20 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनिकेत हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांना दि. 15 रोजी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यावेळी अज्ञाताने कदम यांना कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर एक कुरियर बुक केले असून, ते मुंबई ते तैवानला पाठविण्यात येत आहे. त्या पार्सलमध्ये 4 पासपोर्ट, 4 बँक क्रेडिट कार्ड, 15 किलो कपडे, 200 ग्रॅम एमडीएमए, एक जोड बूट अशा वस्तू असल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितले. त्यामुळे कदम यांना धक्काच बसला.

याबाबत नार्कोटिक्समध्ये फिर्याद द्यायची नसेल तर आमच्या कंपनीला तुमची चौकशी करावी लागेल, असेही त्या व्यक्तीने सांगितले. संशयिताने कदम यांना त्यांच्या मोबाईलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या अ‍ॅपद्वारे माहिती मिळवून अज्ञाताने तुमचे आधारकार्ड वापरून दिल्ली, गुरगाव, हरियाना, चेन्नई, पुणे इत्यादी ठिकाणी 17 बँकांमध्ये मोहंमद इस्माईल मलिक या व्यक्तीसोबत जॉईंट खाते उघडण्यात आले आहे. आणि तो सध्या मनीलाँड्रिंगच्या गुन्ह्यात मुंबईत तुरुंगात असल्याचे सांगितले.

जोपर्यंत तुम्ही निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुमचे बँक खाते सील करावे लागेल, असे सांगून कदम यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अज्ञाताने कदम यांच्या बँक खात्यातून 20 लाख रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कदम यांनी तातडीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उच्चशिक्षित तरुण लक्ष्य

उत्तर भारतातून पोलिस असल्याची बतावणी करून, नार्कोटिक्स विभागातून तसेच कुरियरमधून बोलत असल्याचे सांगून गंडा घालण्यात येत आहे. यासाठी उच्चशिक्षित तरुणांना लक्ष्य करण्यात येत आहे. मोठमोठ्या धमक्या दिल्या जात असल्याचे उच्चशिक्षित तरुण याला बळी पडत असल्याचे दिसून येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT