Pudhari
सांगली

‌Kedar Nayakvadi: ‘हुतात्मा‌’च्या अध्यक्षांकडून 170 कोटींची साखरचोरी

केदार नायकवडी यांचा आरोप; प्रादेशिक सहसंचालकांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यात गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष रेकॉर्डवर न दाखवता मोठ्या प्रमाणावर साखरचोरी होत असल्याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आणि चीफ केमिस्ट बी. एस. माने यांनी संगनमताने सन 2015 ते 2025 या कालावधीत तब्बल 170 कोटी रुपयांहून अधिक किमतीची साखरचोरी केली आहे, असा आरोप युवा नेते केदार अरुण नायकवडी यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केला.

नायकवडी म्हणाले, कारखान्यात नोंदीवर नसलेला सुमारे 40 हजार क्विंटल साखरेचा साठा आढळल्याची तक्रार 3 डिसेंबर 2025 रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार 23 डिसेंबर 2025 रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी हुतात्मा साखर कारखान्याच्या गोदामावर छापा टाकून गोदाम क्रमांक 1, 6 आणि 7 यांची तपासणी केली. यावेळी गोदाम क्रमांक 1 सील करण्यात आले असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईदरम्यान कारखाना व्यवस्थापनाकडून अधिकाऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचेही पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. 5 जानेवारी 2026 पासून गोदामातील साखरेची मोजणी सुरू करण्यात आली. ती 30 जानेवारीरोजी पूर्ण झाली. मात्र इतका कालावधी उलटूनही या प्रकरणाचा अधिकृत अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाकडून कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची शक्यता आहे. ही तपासणी संशयास्पद वाटत आहे.

केदार नायकवडी म्हणाले, गेल्या 10 ते 12 वर्षांत अध्यक्ष वैभव नायकवडी व चीफ केमिस्ट बी. एस. माने यांनी संगनमताने चुकीची नोंदवही तयार करून साखरेत गैरव्यवहार केला आहे. तसेच गेल्या 20 वर्षांत संस्थापक नागनाथअण्णांनी उभारलेल्या संस्थांचे कोणतेही लक्षणीय विस्तारीकरण झालेले नसताना तसेच क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या कोणत्याही चळवळीसाठी एक रुपयाही खर्च न करता कारखान्यावर 500 कोटी रुपयांहून अधिक कर्ज कसे झाले, असाही प्रश्न आहे.

दरम्यान, 2017 साली ॲग्री नित्यम फूड प्रोडक्ट्स सर्व्हिसेस एलएलपी नावाची कंपनी नोंदणीकृत करून 2017 ते 2024 या कालावधीत सुमारे 14 लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर टेंडरपेक्षा कमी दराने हुतात्मा बझारच्या माध्यमातून विक्री करण्यात आली. या कंपनीमध्ये अध्यक्ष वैभव नायकवडी हे डिसिगनेटेड पार्टनर असून त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदींचे उल्लंघन करून अधिकाराचा गैरवापर केला आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी उभारलेला हुतात्मा साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ मानला जातो. या संस्थेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून खासगीकरणाचा डाव रचला जात आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी सभासद व शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही नायकवडी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT