मिरज : परकीय चलनामध्ये ट्रेडिंग करून जादा परवान्याचे आमिष दाखवून सुभाषनगर येथील चौघांची 17 लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 15 जुलै 2021 ते 18 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला. याप्रकरणी मौलासाब इसनसाब कोल्हार (रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनल करण तकतराव (वय 35, रा. खारघर, नवी मुंबई) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत माहिती अशी की, संशयित कोल्हार याची के असोसिएट नावाची कंपनी आहे. त्याने परकीय चलनात परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास एक लाखावर दहा महिन्यांमध्ये दीड लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.
फिर्यादीकडून 3 लाख 70 हजार, संजय तुकाराम माईन यांच्याकडून 2 लाख 40 हजार, राजू गाडेकर यांच्याकडून एक लाख तर भास्कर होनकांबळे यांच्याकडून 10 लाख रुपये असे 17 लाख 100 रुपये इतकी रक्कम घेतली, मात्र दोन वर्षानंतरही परतावा मिळत नसल्याने त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. तो मोबाईल बंद करुन गायब झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व इतर चौघांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित कोल्हार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आणखी काही जणांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.