सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1 हजार 594 कोटी रुपये किमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, वाकुर्डे, डावा कालव्याच्या कामांनाही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातून मात्र अपेक्षाभंग झाल्याचा सूर व्यक्त होताना दिसत आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1 हजार 594 कोटी रुपयांची योजना आहे. त्याची उभारणी संंख मध्यम प्रकल्पाच्या 200 हेक्टरवर होणार आहे. म्हैसाळ सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. तेथून विविध टप्प्यांमध्ये पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील दुष्काळी भागातील 1 लाख 7 हजार 197 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी दिले जाणार आहे. या योजनेचा वीज वापराचा खर्च कमी करणे व हरितऊर्जा निर्मितीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हा ऊर्जा कार्यक्षम जलव्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी केएफडब्ल्यू जर्मन बँकेकडून सुमारे 1 हजार 120 कोटी रुपये कर्ज स्वरूपात व 474 कोटी रुपये राज्य शासनाची गुंतवणूक असणार आहे. सुमारे 200 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प असणार आहे. त्यास सोमवारी राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली.
राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणाली सुधारण्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसाहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. त्यातून जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध होणार आहे. ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी 270 कोटी रुपये, टेंभू सिंचन योजनेसाठीही तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदाअंतर्गत जिल्ह्यासाठी 341 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
सांगली येथील कृष्णा नदीकाठावरील रामेश्वर मंदिर ते विष्णू घाटापर्यंत पूरसंरक्षक कामासाठी 2 कोटी रुपये, कोटभाग वाळवा पूरसंरक्षक भिंत, घाट व पायर्या बांधणे 50 लाख, तांबवे पूरसंरक्षक भिंत, घाट बांधकाम 50 लाख, शिराळा येथे तोरणा ओढ्यावरील पूरसंरक्षक भिंत व घाट बांधकाम 50 लाख, कृष्णाघाट मिरज येथे कृष्णा नदीवर पूरसंरक्षक भिंत व घाट बांधकाम 50 लाख, तसेच पूरसंरक्षक भिंत बांधकामासाठी ढवळी, म्हैसाळ, सांगली लिंगायत स्मशानभूमी यासाठी प्रत्येकी 50 लाख, बोरगाव पूरसंरक्षक भिंत 1 कोटी, निलजी बामणी येथे पूरसंरक्षक भिंत बांधकामासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजने जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी बर्याच मागण्या केलेल्या आहेत. मालमत्ता खरेदी करताना इमारतींवरील जीएसटी, व्यवसाय कर, वीजदर याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र त्यापैकी कोणत्याही मागणीचा विचार झालेला नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये तरी उद्योगांचे प्रश्न सोडविण्यावर भर असावा, अशी मागणी होत आहे.
क्रीडा संकुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1 टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाबरोबरच तालुका क्रीडा संकुलाच्या दुरुस्ती कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध होईल, अशी माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, वाकुर्डे योजनेच्या कामासाठी 101.50 कोटी रुपये व डाव्या कालव्याच्या कामासाठी 29 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. वारणा दगडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 20 कोटींची तरतूद केली आहे. वाकुर्डे, डावा कालव्यासाठी तसेच मतदारसंघातील विकास कामांसाठी अधिकाधिक निधीसाठी पाठपुरावा करणार आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव (ता. वाळवा) येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावाने प्रस्तावित चिरागनगर (मुंबई) येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या कामांना गती मिळणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वार्षिक योजनेंतर्गत 20 हजार 165 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही तरतूद 2 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे सांगली जिल्हा वार्षिक योजनेसाठीही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढीव निधी मिळेल.
राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रियेचा 8 हजार 200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील नगरपालिकांनाही त्यातून निधी उपलब्ध होईल. शेरीनाल्याच्या सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पाची किंमत 93.31 कोटी रुपये आहे. त्याची प्रशासकीय मान्यता रखडली आहे. त्यास चालू आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार का, याकडे लक्ष लागले आहे.