सांगली : धार्मिक भावना दुखावणार्या वक्तव्यानंतर मिरजेत झालेल्या दोन गटांतील धुमश्चक्रीप्रकरणी पोलिसांनी सुमारे 150 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 35 जणांची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, समाजमाध्यमांतून अफवा पसरविणार्यांवरही कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी सांगितले.
याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी नामदेव नवनाथ माने (वय 20, रा. म्हैसाळ रस्ता, मिरज) याला अटक केली आहे, तर साकीब असीफ कोतवाल (20, रा. शास्त्री चौक, मिरज) याने मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घुगे म्हणाले, मिरजेत दोन मित्रांमध्ये मंगळवारी शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला. यानंतर पोलिस ठाण्यासमोर बेकायदा जमाव जमला होता. याप्रकरणात पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य करणार्यावर कारवाई केली आहे, तसेच बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकार्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
घुगे म्हणाले, मिरजेत दोन गटात झालेल्या वादाबाबत अनेकांना नेमकी माहितीच नव्हती. अर्धवट माहितीच्या आधारे अनेकजण एकत्र आले होते. त्यांनी बेकायदा जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वादावादीनंतर वाहनांची तोडफोड झाल्याची कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत आली नाही. एका फलकाचा चोळामोळा करण्यात आला. कोणत्याही फलकावर धार्मिक नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणावरून कोणीही अफवा पसरवू नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीसह सर्वांनी सहकार्य करावे.
सर्व पोलिस यंत्रणा सक्रिय
मिरजेत तणाव निर्माण झाल्यानंतर मिरज विभागातील मिरज शहर, मिरज ग्रामीण, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे, कुपवाड एमआयडीसी, स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुख्यालयातील सर्व शाखा सतर्क आणि सक्रिय झालेल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण व मिरज शहर पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत.
अफवा पसरवणारे स्टेटस ठेवणार्या 9 जणांवर कारवाई
मिरज धुमश्चक्रीप्रकरणी अफवा आणि दिशाभूल करणारे स्टेटस ठेवणार्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मिरजेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, समाज माध्यमांवर रात्रीत अनेक दिशाभूल करणारे संदेश पसरले. त्यानंतर अधीक्षकांनी तातडीने सायबर शाखेला कारवाईचे आदेश दिले. यावेळी 9 जणांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिशाभूल करणारे स्टेटस ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यांना भारतीय दंड संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर किंवा दिशाभूल करणार्या पोस्ट करणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस अधीक्षक घुगे यांनी दिला आहे.
शांतता समितीची बैठक
मिरजेतील धुमश्चक्रीनंतर सर्वत्र वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मिरजेतील आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह प्रशासन अधिकारी, शांतता समिती, प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.