सांगली ः सोमवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. 66 शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात नापास कोण झाले का, ही शोधण्याची वेळ आली. दहा वर्षांची तुलना करता विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आणि उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र उत्तीर्ण होण्याचा आलेख जसा वाढतोय, तशी गुणवत्ता वाढली का, हा संशोधनाचा विषय. त्यामुळे कागदावरच्या गुणवत्तेपेक्षा ज्ञानाची गुणवत्ता वाढेल त्यादिवशी जिल्ह्याचा खर्याअर्थांनी शैक्षणिक दर्जा उंचावेल, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
‘मुलांची बोर्डाची परीक्षा आहे, आपली मुलगा-मुलगी बोर्डात येणार’, असे शब्द काही वर्षांपूर्वी ऐकायला मिळायचे. मात्र सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला पूर्वीच्या तुलनेत महत्त्व कमी झाले आहे. बहुसंख्य विद्यार्थी बोर्डाची परीक्षा केवळ पात्र होण्यासाठी नाममात्र देत आहेत. जेईई, नीटवर विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मात्र करिअरसाठी टर्निंग पॉईंट असणार्या या परीक्षेबद्दल विद्यार्थी गंभीर नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
काही वर्षांपूर्वी बोर्डाची परीक्षा नापास होण्याच्या भीतीने किंवा टक्केवारी वाढण्यासाठी अनेक विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करत होते. मात्र आज पास होण्यापेक्षा नापास होणे अवघड झाले आहे. कॉलेजकडे प्रॅक्टिकलचे 30 मार्क असतात. बहुसंख्य कॉलेजमध्ये 25 ते 30 च्या दरम्यान मार्क विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामुळे लेखी परीक्षेत 5 ते 10 मार्क पडल्यानंतर विद्यार्थी आपसूक पास होतो. त्यामुळे विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. किंबहुना आज नापास होणे अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सहा ते सात वर्षापूर्वी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेमध्ये ठराविक गुण मिळवणे हे बंधनकारक होते. या निर्णयामुळे प्रॅक्टिकलमध्ये अगदी पैकीच्या पैकी गुण पडूनही विद्यार्थी नापास होत होते. परिणामी अनेक कॉलेजमध्ये प्रवेश जागा रिक्त असायच्या, त्यामुळे उत्तीर्ण होण्याच्या निकषात बदल केल्याचे बोलले जाते.
पूर्वीची आणि सध्याची परिस्थिती पाहिल्यास परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा टक्का आणि मिळणार्या गुणांचा आलेख वाढला आहे. दहा - बारा वर्षांपूर्वी 55 ते 60 टक्के गुण पडले की पोरं आणि त्यांच्या घरचे खूश होत होते. पेढे वाटून आनंद साजरा केला जायचा. मात्र आज 80 ते 85 टक्के गुण पडले तरी अनेकांचे चेहरे हिरमुसलेले दिसतात. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात पूर्वी कॉलेजची संख्या मर्यादित होती. प्रवेशासाठी मेरिटलिस्ट लागत होती. त्यामुळे जास्त गुण मिळण्यासाठी विद्यार्थी धडपडत होते. मात्र सध्या कॉलेज आणि कोर्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमी गुण असतानाही सहज प्रवेश मिळत आहे. त्यामुळे मेरिटमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड कमी झाल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात बारावीचा निकाल 80 ते 82 टक्के लागत होता. मात्र यामध्ये सध्या 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात 90 टक्क्यांच्या पुढेच जिल्ह्याचा निकाल लागत आहे. गेल्या आठ ते दहा वर्षात बारावीच्या निकालात कागदावर गुणवत्ता वाढल्याचे दिसते. मात्र खरंच मुलांना मिळणार्या ज्ञानाची, शिक्षणाची गुणवत्ता वाढली का, असा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे केवळ पास होण्यासाठी परीक्षा देण्यापेक्षा ज्ञानात वाढ करण्यासाठी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही जाणकारांनी व्यक्त केली.
कोल्हापूर विभागात सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षाची तुलना करता सांगली जिल्हा पिछाडीवर राहिला आहे. 2022 ते 2024 पर्यंत विभागात तिसरा क्रमांक मिळाला आहे. यावर्षी मात्र जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
गुण वाढले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली का, याचे पालक, शिक्षकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुलांना कोणतीही गोष्ट लादण्यापेक्षा त्यांना कलागुणांना वाव देण्याची आवश्यकता आहे.एम. बी. मोहिरे, उपप्राचार्य, कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली