Drowning Death Pudhari Photo
सांगली

Sangli Drowning Death: पोहायला शिकताना विहिरीत बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

घरनिकी येथील घटना : आई-वडिलांचा आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : घरनिकी (ता. आटपाडी) येथे पोहायला शिकण्याचा आनंद घेणाऱ्या 11 वर्षांच्या आरुष तातोबा घाडगे (रा. औताडे वस्ती, घरनिकी) या निष्पाप मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरुष हा वडील तातोबा घाडगे यांच्यासोबत विहिरीवर पोहायला शिकण्यासाठी गेला होता. आरुषच्या कमरेजवळ दोरीने प्लास्टिकचा कॅन बांधून त्याला पाण्यात पोहण्याचा सराव करून घेतला जात होता. काही वेळ सराव केल्यानंतर सर्व जण विहिरीच्या बाहेर आले. आरुषही विहिरीबाहेर आला. मात्र, पोहता आल्याच्या आनंदात आणि आत्मविश्वासाने त्याने वडिलांना, ‌‘मी अजून एकदा उडी मारून बाहेर येतो‌’ असे सांगितले आणि पुन्हा विहिरीत झेप घेतली. पाण्यात उडी मारताच त्याच्या कमरेजवळ बांधलेली दोरी आणि कॅन अचानक सुटले. क्षणार्धात तो विहिरीच्या खोल पाण्यात बुडू लागला. हे पाहताच वडिलांसह नातेवाईकांनी विहिरीत उड्या घेतल्या. त्यांनी आरुषचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र खोल पाण्यामुळे तो मिळून आला नाही.

घटनेची माहिती मिळताच पलूस येथील रेस्क्यू टीमला (बचाव पथक) पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आरुषचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. आरुषचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर आई-वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. काही क्षणांपूर्वी हसणारा-खेळणारा आरुष कायमचा सोडून गेल्याने परिसरावर शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT