सांगली : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत महापालिका क्षेत्रातील 102 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र आणि गरजू लाभार्थ्यांसाठी ‘प्रधानमंत्री आवास सर्वांसाठी घरे’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा दुसरा टप्पा सप्टेंबर 2024 पासून सुरू झाला आहे. याअंतर्गत महानगरपालिकेकडे वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांसाठी 343 लाभार्थीनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कागदपत्रांची छाननी करून 102 लाभार्थींची यादी मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. उर्वरित व नव्याने प्राप्त होणार्या ऑनलाईन अर्जांची छाननी करून त्यांचाही प्रस्ताव लवकरच शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
राज्य शासन प्रति घरकुल एक लाख, तर केंद्र शासन प्रति घरकुल दीड लाख रुपये, असे अनुदान मिळते. घरकुल मंजूर झालेल्या 102 लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना काढून प्रधानमंत्री आवास योजना कक्षामध्ये जमा करावा. ज्यांनी बांधकाम परवाना काढलेला आहे, त्यांनी त्याची एक प्रत जमा करून तत्काळ बांधकाम सुरू करण्याचे आहे. यानंतर मंजूर लाभार्थीना त्यांच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना महानगरपालिकेकडून विशेष बाब म्हणून बांधकाम परवाना शुल्कामध्ये मटेरियल चार्जेस व स्वच्छता उपकर, यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.