जत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील सोसायटी गटाच्या निवडणुकीत रविवारी शंभर टक्के मतदान झाले. आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विनोद पवार यांच्यातील प्रतिष्ठेच्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी मतदारांना कवठेमहांकाळची मतपत्रिका दिल्याचा प्रकार आणि गुप्त मतदानाऐवजी उघडपणे मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारावरून दोन्ही बाजूंनी आक्षेप घेतल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. दरम्यान, मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत माजी आमदार विक्रम सावंत यांनी फेरमतदानाची मागणी केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जतचा सोसायटी गट सुरुवातीपासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. दुष्काळाचे कारण देत अन्य ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला असताना जत तालुक्यात मात्र निवडणूक झाली. उमेदवारीवरील आक्षेप आणि न्यायालयीन लढाईमुळे हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विनोद पवार यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीला वेगळे राजकीय वळण मिळाले.
रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही गटांनी आपापल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आमदार पडळकर यांच्या समर्थकांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतदान केले. एकाच वेळी दोन ट्रॅव्हल्समधून मतदान केंद्रावर मतदारांचं मतदान करून घेतले. त्यानंतर विनोद पवार यांचे समर्थक रॅलीने मतदान केंद्रावर दाखल झाले. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि धाकधूक दिसून आली. मतदान केंद्राबाहेर समर्थकांची मोठी गर्दी होती. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी बारापर्यंत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतपत्रिकेच्या प्रकाराने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मतदान सुरू असताना काही मतदारांना कवठेमहांकाळ गटाची मतपत्रिका दिल्याचे निदर्शनास आले. यामुळे दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मतपत्रिकांच्या वैधतेबाबत शंका उपस्थित झाल्याने काही काळ मतदान थांबविण्यात आले. मतपत्रिका तपासून योग्य ती खबरदारी घेण्याची हमी दिल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले.
गुप्त मतदानाच्या मुद्द्यावरून दोन्ही गट आमने-सामने
मतदानादरम्यान काही मतदार उघडपणे मतदान करीत असल्याचा आरोप उमेदवार विनोद पवार यांनी केला. गुप्त मतदानाची प्रक्रिया पाळली जात नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. यावरून पडळकर आणि पवार गटाचे प्रतिनिधी आमनेसामने आले. काही काळ शाब्दिक वाद झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. मतदान अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत केली.