पलूस येथे 10 वर्षीय चिमुकलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार File Photo
सांगली

पलूस येथे 10 वर्षीय चिमुकलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार

तालुक्यात खळबळ ः आईच्या तक्रारीनंतर नराधमास अटक

पुढारी वृत्तसेवा

पलूस ः बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. 36 वर्षीय नराधम बापाने त्याच्याच 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित बापाला तत्काळ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पलूस पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना 19 एप्रिल ते 1 मे या कालावधीत घडली. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना, तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसर्‍या खोलीत नेले. तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलेस, तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकीही त्याने मुलीस दिली. त्यानंतर 1 मेपर्यंत त्याने दोन वेळा असेच कृत्य केले.

या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईला मोठा धक्का बसला. तिने तत्काळ पतीला जाब विचारला असता, या नवरा-बायकोमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर, आईने पीडित मुलीला घेऊन थेट पलूस पोलिस ठाणे गाठले आणि सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, 21 मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याआधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली. पुढील तपास पलूस पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT