सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग रविवार, दि. 14 रोजी वाढविण्यात येणार आहे. तसेच चांदोलीबरोबरच धोम, कण्हेरमधूनही पाणी सोडणे सुरू आहे. परंतु कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन लाख 25 हजार विसर्ग सुरू ठेवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी वाढण्याऐवजी स्थिर राहणार आहे. सध्यापेक्षा पातळीत एक-दोन फूट वाढून ती पुन्हा कमी होईल, असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. पण धरण परिसरात अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात म्हणजे शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी आठ ते शनिवार, दि. 13 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत व आज दिवसभरात कोयना येथे अनुक्रमे 96,29 मिमी पाऊस पडला. नवजाला 125 व 21 आणि महाबळेश्वरला 179 व 35 मिमी पावसाची नोंद झाली. धोम, कण्हेर, चांदोलीतही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे कोयनातून प्रतिसेंकद 10 हजार 100 क्युसेक विसर्ग शुक्रवारी सुरू करण्यात आला. धोममधून 2100 तर कण्हेरमधून 9637 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
शनिवारी कोयना धरणात 55 हजार क्युसेक पाणी प्रतिसेंकदाला येत आहे. त्यामुळे सायंकाळी धरणामध्ये 92.59 टीएमसी (87.97 %) पाणीसाठा झाला. मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये चार टीएमसी वाढ झाली. हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवसात अतिपर्जन्यमान होण्याची पूर्वसूचना दिली आहे. त्यामुळे उद्या (रविवार) दि. 14 रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फूट 6 इंच उघडून त्यातून 28 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. कोयना धरणातून एकूण 30 हजार 100 क्युसेक पाणी प्रतिसेंकदाला नदीपात्रात येणार आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोलीत पाणीसाठा 31.2 टीएमसी झाला असून येथून 9365 विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे.
शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. सायंकाळी पाणी हळूहळू उतरू लागले. जिल्ह्यातील बहे पुलाजवळ पातळी 9 फूट 10 इंच होती. ताकारीत 29, भिलवडीत 30 तर सांगलीत आयर्विनजवळ पाणी अर्धा फुटाने उतरून 29 फूट 5 इंच होते. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून गेली आठ दिवस मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. शनिवारी यात वाढ करून तो दोन लाख 25 हजार केला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी फारशी वाढली नाही. सांगलीत पाणीपातळी स्थिर आहे.