Sadabhau Khot CJP Protest Pudhari
महाराष्ट्र

Sadabhau Khot: CJPच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोत आक्रमक; आंदोलकांना 'दहशतवादी' म्हणत सरकारच्या भूमिकेचं केलं समर्थन

Sadabhau Khot CJP Protest: जंतर-मंतरवरील पेपर लीक आंदोलनावरून सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची 'दहशतवादी प्रवृत्ती' अशी तुलना करत सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, असे म्हटले.

पुढारी वृत्तसेवा

Sadabhau Khot CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या पेपर लीकविरोधातील आंदोलनावरून सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलकांवर टीका करताना त्यांनी त्यांची तुलना 'दहशतवाद्यांशी' केली असून, अशा प्रवृत्तीला सरकारने लोकशाहीच्या चौकटीत राहून ठाम उत्तर द्यावे, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

खोत म्हणाले की, पेपर लीक प्रकरणात दोषींना अटक करण्यात आली असून चौकशीही सुरू आहे. सरकार दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणे चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणाचा वापर करून विरोधक केंद्र सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित सोशल मीडिया गट मुद्दाम आंदोलनाला अधिक चिथावणी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पेपर लीक प्रकरणाची चौकशी सुरू असतानाही त्यावरून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलकांचा उल्लेख 'दहशतवादी प्रवृत्तीचे' असा केला. सरकारने अशा प्रवृत्तीला कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गानेच उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलकांची दहशतवाद्यांशी तुलना केल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात असून विरोधकांनी खोत यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलनासोबतच सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचीही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT