Rohit Pawar DGCA  Pudhari
महाराष्ट्र

Rohit Pawar: DGCA विरोधात FIR न घेतल्यास बारामती पोलीस ठाण्यात ठिय्या; रोहित पवारांचा अल्टिमेटम

Rohit Pawar: बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेनंतर तपासातील दिरंगाईवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. DGCA विरोधात FIR दाखल न झाल्यास बारामती पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Rahul Shelke

Rohit Pawar: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. बारामतीजवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चार्टर विमान लँडिंगपूर्वी कोसळलं होतं. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. मात्र, कालांतराने या अपघातामागे निष्काळजीपणा किंवा संभाव्य घातपात असण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली.

रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली होती. VSR विमान कंपनीच्या भूमिकेवर त्यांनी थेट बोट दाखवत “इतका गंभीर अपघात होऊनही संबंधितांवर तात्काळ कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, नागरी उड्डाण महासंचालनालय म्हणजेच Directorate General of Civil Aviation (DGCA) विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी त्यांनी केली आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा संशय असतानाही DGCA कडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई व्हायला हवी होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.

रोहित पवार यांनी थेट अल्टिमेटम देत सांगितलं आहे की, जर DGCA विरोधात FIR नोंदवण्यात आला नाही, तर ते बारामती पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करतील. “हा प्रश्न राजकारणाचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा आहे.विमान वाहतुकीसारख्या संवेदनशील क्षेत्रात जर नियम पायदळी तुडवले जात असतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या भूमिकेमुळे आता प्रशासनावर दबाव वाढला असून, या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT