Mumbai–Pune Expressway Shutdown: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली आणि हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेनंतर सरकारने नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश दिले. मात्र, “अशा चौकशांमधून सरकार आणि प्रशासन काही धडा घेतं का?” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता मुंबई–पुणे द्रुतगतीवर गॅस टँकर उलटला. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली, हे योग्यच होतं. पण अशा दुर्घटना घडल्यावर कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा कसा करता येईल, याचा ठोस कृती आराखडा प्रशासनाकडे होता का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.
''मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.
मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?
परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.
राज ठाकरे ।''
मुंबई आणि पुणे ही राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं असल्याचं एकीकडे सांगायचं, आणि दुसरीकडे या दोन शहरांमधील वाहतूक तब्बल 32 तास ठप्प राहते, हे निमूटपणे पाहायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
या काळात ज्या प्रवाशांकडून टोल वसूल करण्यात आला, तो परत केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. केवळ चौकशीचा फार्स न करता भविष्यात अशा कोणकोणत्या घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा करायचा, याचा सविस्तर कृती आराखडा तयार करून तो जनतेसमोर मांडला पाहिजे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्रीपदावरून वादही सुरू असतात. तरीही नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का निर्माण होते, याचा सरकारने गंभीरपणे विचार करायला हवा, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.