रायगड

कोकणात ४ लाख १६ हजार हेक्टरवर खरीप पीक

दिनेश चोरगे

रायगड; पुढारी वृत्तसेवा : कोकणात सर्वसाधारणपणे ४ लाख १६ हजार हेक्टर खरीप क्षेत्र आहे. यात सर्वाधिक १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र रायगडमध्ये खरीपासाठी उपयोगात आणले जाते. कोकण कृषी विद्यापीठ आणि शासनाचा कृषी विभागाने एकत्रीत विचार करुन भात लागवडीबाबत विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर भात उत्पादनात वाढ होते आहे. अलिकडच्या काळात घरचे भात बियाणे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. सुधारित जातीचे बियाणे तीन वर्षासाठी वापरले जाते. त्यामुळे भात पिकातील भेसळ कमी होते. विशेषत: कोकणात वाडा कोलम, मुरबाड, झिली, लाल पटनी या स्थानिक भाताच्या वाणाला अधिक मागणी असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादन कार्यक्रम वाढविले आहेत.

सन २०२३ २४ या वर्षातील खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातून १३७२ क्विंटल, पालघरमध्ये ११७५१ क्विंटल, रायगडमध्ये ४५८५ क्विंटल, रत्नागिरीमध्ये १९६५ क्विंटल, सिंधुदुर्गमधून १८४६ क्विंटल बीयाणांची मागणी आहे. २१५१९ क्विंटल एकूण भाताचा बीयाणांची मागणी महाबीज विद्यापीठ आणि खाजगी क्षेत्रातून पूर्ण करण्यात येणार आहे. कोकण विभागात भाताच्या बियाणांची कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी कृषी विभागाने घेतली आहे. शासनाच्या कृषी आराखड्यानुसार यंदा हेक्टरी उत्पादन वाढीसाठी विविध नविन तंत्रज्ञानाचा वापर होवून उत्पादनात वाढ होणार आहे. शासन केवळ बीयाणांची उपलब्धता करुन थांबले नाही तर त्यासाठी लागणारे खते देखील वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचतील याची काळजी घेणार आहे. भातासाठी लागणारा आणि अन्य पिकांसाठी लागणाऱ्या खतांच्या पुरेसा साठा उपलब्ध आहे.

कोकण विभागात यंदा ९८२०० मेट्रीक टन खताची मागणी आहे. यात युरिया, ङिए. पी., एम.ओ.पी., एस.एस.पी, एन पी. के आणि इतर खतांचा पुरेसासाठी जिल्हानिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. खतांच्या आणि बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी शासनाने कोकण विभागात ५० भरारी पथक स्थापन केले. ५० निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष, ४४ तालुकास्तरीय तक्रार निवारण व कक्ष आणि संनियंत्रणासाठी विभाग आणि जिल्हा स्तरीय समित्यांच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

यासाठी कोकण विभागात ६० अर्धावेळ जि.प. निरीक्षक ७९ अर्धवेळ राज्य निरीक्षक, ७ पूर्णवेळ निरीक्षक, असे एकूण १४६ निरीक्षक यासाठी नेमण्यात आली आहेत. उपलब्ध कीटक नाशके आणि परवानाधारक विक्री केंद्रांमध्ये हा साठा उपलब्ध आहे. जैविक खतांच्या अधिकाधिक वापर करण्याचा दृष्टीने कृषी विभाग शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रात्याक्षिक दाखवित आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत शेती विषयक योजना लोकांपर्यंत पोहचवत आहेत. यात पिक प्रात्यक्षिके, शेती शाळा, बीज प्रक्रिया, ग्रामबीजेत्पादन यासह प्रचार प्रसार होतो आहे. भात लागवडीच्या विविध पद्धतीत श्री पद्धत, एसआरटी पद्धत यंत्राद्वारे भात लागवड, चारसूत्री पद्धत, ड्रम सीडर, मॅन्युअल सीडरद्वारे भात लागवड या विस्ताराच्या योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

कोकणातील जिल्हा निहाय क्षेत्र (हेक्टर)

  • रायगड १ लाख ६ हजार
  •  पालघर १ लाख ४ हजार
  •  रत्नागिरी- ८० हजार
  • सिंधुदुर्ग – ६६ हजार
  • ठाणे ५९ हजार

कोकण विभागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. खते, बि- बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागा प्रयत्न करणार आहे. शेतीसाठीच्या पाणी साठविण्यासाठी जलकुंभासारखे नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासंदर्भात विचार व्हावा. खरीप हंगामात खतांचा व बि- बियाणांचा पुरेसा पुरवठा केला जाईल. -अब्दुल सत्तार, कृषी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT