विन्हेरे : विराज पाटील
महाड हे धार्मिक प्रवृत्तीचे गांव म्हणून ओळखले जाते. या गावात विविध प्रकारची देवळे आहेत. महाड आणि महाडचा परिसर याला महाराष्ट्र शासनाने तिर्थ क्षेत्राचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या शहराच्या दक्षिण टोकाला विन्हेरे नावाचे ऐतिहासिक गाव आहे.
सह्याद्रीच्या उंच उंच रांगा आणि रायगड जिल्ह्याचा शेवट म्हणून या विभागाची ख्याती आहे. याच गावात आई माता झोलुबाईचं देवस्थान आहे. अशीच एक झोलाई नावाची देवता पाचाड जवळील वाडीस असून तिची पालखी आपला भाऊ रवलनाथ महाराज ठिकाण नाते या ठिकाणी सन्मानाने शिवूपर्व काळापासून आजपर्यंत येत असते. त्याचप्रमाणे या झोलाई देवी विन्हरे देवताचे महाडच्या विरेश्वर महाराज देवस्थानशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराज यांची ही थोरली बहिण म्हणून समजली जाते. आपले पूर्वज फारच जाणकार होते. देवदेवतांचे नाते संबंध जोडून गावागावात सामंजस्य एकोपा आणि आदर भाव निर्माण करण्याचा तो एक सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे.
रवळनाथ, झोलाई, विरेश्वर, सोमजाई, कोटेश्वरी, बहिरी काळभैरव व अन्य देवदेवतांचा फार मोठा परिवार असून यात्रेच्या वेळी ही सर्व भावंडे एकत्र जमत असतात पुजा अर्चा, गोंधळ ,महाप्रसाद आणि (छबिना) मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि एक सहविचारांचा स्नेहभावाचा मैत्रीचा उत्सव लोक साजरा करताना दिसतात. दिवसभराची दुःखे विसरुन हा उत्सव होत असतो. झोलाईदेवी म्हणजे सार्या पंचक्रोशीचं दैवत, सार्यांचे मान या दैवतावर सारेच जण हक्क सांगताना दिसतात. समाज व्यवस्थापनात सार्या जातींना मानाचे आदराचे स्थान असते.
आपआपली कामे लोक त्या त्या जातीचा सन्मान आहे असे समजून करत असतात. धोबी देवीची वस्त्रे पायघड्या इत्यादी धुण्यात धन्यता मानतात. सोनार मंडळी मुखवट्यांना पॉलिश करुन देतात. भोई लोक पालखिचा सन्मान सांभाळतात. कष्टकरी हमाल मंडळी आलेल्या गाव देवीला मोठ्या सन्मानाने परत घेऊन जात असतात. तर छबिन्याचा उत्सव दिसावा म्हणून खोबरे जाळून त्याच्या मशाली पेटवितात. यालाच हिलाल असा शब्द प्रयोग आहे. हिलालाचा दांडा हातात घेऊन एकजण उजेड दाखवत असतो तर दुसरा सहकारी त्या मशालिला नारळ टाकून जाळ तेवत ठेवण्याचे काम करतो हे काम कातकरी मंडळी आपला सन्मान म्हणून करत असतात.
देवीचे नत्ररात्र नऊ दिवस मोठ्या थाटाने चालते. सारा विन्हेरे गांव नवरात्रात रममाण होतो. रोज देवीची पुजा अर्चा स्नान संध्या, नंदादीप महावस्त्र आणि फुलांचा साज देवीला वाहण्यात येतो. पुजारी मंडळी हे काम आवडीने करतात. महाडकर मंडळी देवीच्या दर्शनाला आवर्जुन जातात. छबिन्याला देवी महाडला येते. नगारा निनादतो आई माता झोलुबाई भोईघाटावर थांबते. विरेश्वर देवस्थानचे पंच आरती घेऊन देवीला गावात येण्याचे निमंत्रण देतात. इथपासून देवीचे मानकरी भोई लोक असतात. पायघड्या घालून महाडची माहेर वासीण मोठ्या डौलाने भावाला भेटावयास येते. येथे रात्री सर्व भावंडांचे मान सन्मान होतात. गोंधळी देवांचे गोंधळ घालतो. महाप्रसाद होऊन भोजन करुन सर्व देव देवता शोभा यात्रेला तयार होतात.
झोलाई देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे लोक भक्ती भावाने देवीला नवस करतात. मनोकामना पूर्ण झाली म्हणजे नवस फेडतात. माता आपल्या मुलांना चांगले आयुआरोग्य लाभावे देवीची कृपा आपल्या बाळावर रहावी म्हणून लहान मुलांना देवीच्या पायावर ठेवतात.यासाठी भोई घाटावर रात्रीच्या वेळी एकच गर्दी झालेली असते आणि माता आपल्या भक्तांना अभय देत असते असे हे माता झोलाई महाड परिसरांतील एक जागृत साक्षातकारी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र उत्सवांतील अष्टमी म्हणजे महत्वाचा दिवस या मंगलदिनी आपणा सर्वांना माता झोलाई देवी यांनी सुखात समाधानात ठेवावे अशी मंगल चरणी विन्रम प्रार्थना करुन माळ अर्पण करतो.