पनवेल : कळंबोली येथे शेजारी राहत असलेल्या विवाहित महिलेसोबत एकाने प्रेमसंबंध ठेवले. तसेच तिला विश्वासात घेत तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. नंतर या फोटो व व्हिडीओद्वारे तीने संबधित पिडीतेला धमकावत वेळोवळी तिच्याकडून ८० हजार रुपये उकळले. या प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर पोलिसांकडे धाव घेतल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला. संबधित व्यक्तीविरोधात कळंबोली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला (वय ४०) कळंबोली परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी रमजान नदाब (रा. विजापूर, कर्नाटक) हा कळंबोलीत तिच्या शेजारी राहत होता. याच काळात दोघांमध्ये स्नेह वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले. रमजान नंतर विजापूरला परत गेला, मात्र पीडित महिला त्याच्या प्रेमाच्या भूलथापांना बळी पडून त्याला भेटण्यासाठी अनेकदा विजापूरला गेली. याच भेटींमध्ये रमजानने तिला लॉजवर नेऊन शरीरसंबंध ठेवले आणि त्या दरम्यान तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ चोरून काढले.
नंतर काही महिन्यांनी या फोटो व व्हिडीओचा वापर करून रमजानने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हे चित्रफीत सार्वजनिक करण्याची भीती दाखवत त्याने तिला ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले. मागील एका वर्षात पीडितेने भीतीपोटी तब्बल ८० हजार रुपये त्याला पाठवले. मात्र, यानंतरही रमजानची पैशांसाठीची धमकी सुरूच राहिली.
या मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने धाडस करून कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी रमजान नदाब विरोधात खंडणी, लैंगिक शोषण आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून तो कर्नाटकात असल्याची माहिती समोर आली आहे.