माथेरान : मिलिंद कदम
प्रदूषण मुक्त, स्वच्छ, सुंदर,हरित आणि शांत माथेरान अशी ओळख असणार्या या स्थळावर सद्यस्थितीत विविध ठिकाणी प्लास्टिक कचर्याचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे माथेरान प्लास्टिक मुक्त केव्हा होणार ? असा स्थानिकांसमोर यक्षप्रश्न पडला आहे.
काही वर्षांपासून याठिकाणी मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा यामध्ये पिण्याच्या प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, वेफर्स पाकिटे तसेच अन्य कचरा जंगलात अथवा पॉईंट्स भागात विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्याने अनेकदा पर्यावरण प्रेमी नागरिकांनी त्याबाबतचे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्यावर तात्पुरती स्वच्छता राखली जाते. मुख्य प्रवेशद्वार पासून ते वन ट्री हिल पॉईंट्सच्या टोकापर्यंत पाहिल्यास जवळपास सर्वच जंगल भागात मोठया प्रमाणात प्लास्टिक कचर्याचा खच पडलेला निदर्शनास येत आहे.याच प्लास्टिक कचर्यामुळे असंख्य जुनी वृक्षवल्ली सुकून उन्मळून पडत आहेत याचा इथल्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन करिता करोडो रुपये खर्च केले जात असताना सुध्दा कचरा व्यवस्थित संकलन केले जात नाही. नगरपरिषदेच्या कामगारांना, तसेच घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला याबाबत सूचना देऊन नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पॉईंट्स वरील स्टोल्स धारकांनी सुध्दा आपली या गावाविषयी नैतिक जबाबदारी म्हणून पर्यटकांकडून टाकण्यात आलेला कचरा गोळा करून जवळील कचराकुंडीत जमा केल्यास काहीअंशी का होईना स्वच्छतेला हातभार लागण्यास मदत होऊ शकते.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद घनकचर्यावर करोडो रुपये खर्च करते मग कुणा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर प्लास्टिक बॉटल्स उचलण्याची वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे.चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष, माथेरान