रायगड: पश्चिम समर्पित मालवाहू मार्गिका अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर(डब्ल्यूडीएफएल)वरील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यांतील जेएनपीटी ते पालघर जिल्ह्यातील न्यू सफाळे या टप्प्यातील मालगाडीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालगाड्यांची वर्दळ पूर्णपणे थांबणार असून, लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियमित मालवाहतूक लवकरच सुरू होणार भारतीय रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (डीएफसीसीआयएल) गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहेत. अलिकडेच जेएनपीटी बंदर ते पालघर जिल्ह्यातील न्यू सफाळे स्थानकापर्यंत मालगाडी चालवून या मार्गाची क्षमता आणि तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. ही चाचणी यशस्वी झाल्याने आता या मार्गावर नियमित मालवाहतूक लवकरच सुरू होणार आहे.
विरार-डहाणू आणि वसई-पनवेल मार्गावरील समस्या दुर होणार सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू आणि वसई-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात मालगाड्यांची वाहतूक होते. यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा होतो. मालगाड्यांना रस्ता देण्यासाठी अनेकदा लोकल गाड्यांना थांबवले जाते. मालगाड्यांच्या या फेऱ्यामुळे रेल्वेमार्ग व्यस्त रहात असल्याने नवीन लोकल फेऱ्या सुरू करण्यात मर्यादा येतात. मालगाड्यांच्या प्राधान्यामुळे लोकलचे वेळापत्रक अनेकदा कोलमडते.
मुख्य मार्गावरील मालगाड्यांची संख्या होणार कमी
मात्र आता मालगाड्यांसाठी स्वतंत्र डेडिकेटेड रेल्वे ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे, मुख्य मार्गावरील मालगाड्यांची संख्या कमी होईल. परिणामी, लोकल गाड्यांना जादा जागा मिळेल आणि भविष्यात विरार-डहाणू आणि वसई-पनवेल मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे.
डेडिकेटेड रेल्वे ट्रॅकमुळे जलद मालवाहतूक शक्य जेएनपीटी बंदरातून उत्तर भारतात जाणारा माल आता अत्यंत कमी वेळात पोहोचू शकणार आहे. स्वतंत्र डेडिकेटेड रेल्वे ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे वेगवान वाहतुक होवून लॉजिस्टिक खर्च आणि इंधनाची बचत होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील बंदरांना थेट उत्तरेकडील राज्यांशी जोडणारा हा एक महत्त्वाचा आर्थिक कणा ठरणार आहे.
जेएनपीटी ते दादरी (उत्तर प्रदेश) टप्पा मालवाहतूकीस होणार खुला वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या यशस्वी चाचणीनंतर आता उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित करण्यावर भर दिला जाणार आहे. लवकरच जेएनपीटी ते दादरी (उत्तर प्रदेश) हा संपूर्ण पट्टा मालवाहतुकीसाठी खुला होईल, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम मुंबईच्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर दिसेल.मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग मिळाल्याने आता पनवेल येथून सुटणाऱ्या लोकल ट्रेनसह मुंबईच्या लोकलच्या विलंबाची समस्या देखील दुर होणार आहे.