अलिबाग (रायगड) : जिकडे, तिकडे चोहीकडे, पर्यटकांचा बहर सगळीकडे, अशी म्हणण्याची वेळ रायगडवासियांवर आली आहे. नाताळला जोडून आलेली सुट्टी तसेच नववर्षाचे स्वागतासाठी लाखो पर्यटक रायगडातील पर्यटनस्थळी दाखल होत आहे. यामुळे जिल्ह्याचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येने रस्त्यावरील वाहनांची चाके संथ झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह स्थानिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
सलग चार दिवसाच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी रायगड जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. नाताळच्या सुट्टीतच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. शिवाय वर्षाचा अखेरचा दिवस ३१ डिसेंबर यावर्षी बुधवारी आल्याने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगडला पर्यटनाचा बहरच आला आहे. पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागली आहेत.
देश- विदेशातील पर्यटकांचे कोकणात आगमन सुरू झाले असून, पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यटक दाखल होऊ लागले असून, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड जंजिरा, श्रीवर्धन या ठिकाणांना विशेष पसंती दिली आहे. शासकीय विश्रामगृहात निवासव्यवस्था तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल आहे.
किनाऱ्यांना पहिली पसंती
समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण असल्याने किनारे गर्दर्दीन फुलून गेले आहेत. समुद्र किनारी असणाऱ्या निवास व्यवस्थेला पर्यटकांची पहिली पसंती असून, तेथील सर्व आरक्षण आधीच पूर्ण झाले आहे. पर्यटकांमुळे छोट्या छोट्या व्यवसायांना चांगला फायदा होत आहे. सध्या थंडीचा मोसम असल्याने पर्यटकांना शेकोट्या लावून दिल्या जात आहेत. समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. सायंकाळच्या वेळेस किनारे गर्दीने फुल होत आहेत. गर्दीमुळे लहान मुलांसाठी असलेली किनाऱ्यांवरील खेळणी, घोडागाडी, उंट सवारी, तसेच वॉटर स्पोर्टसला चांगला प्रतिसाद आहे.
शहाळ्याला मागणी
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडून कोकणी पदार्थाना मागणी होत आहे. शिवाय अन्य फास्ट फूडचाही खप वाढला आहे. सर्वाधिक मागणी मात्र शहाळ्याची होत आहे. समुद्र किनारपट्टीच नव्हे, तर प्रवासाच्या मार्गात शहाळी आवर्जून खरेदी केली जात आहेत.
एक दिवसाचे पर्यटक अधिक
जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक एका दिवसात परत फिरत आहेत. एसटी, खासगी वाहनातून एका दिवसासाठी आलेले पर्यटक सायंकाळी माघारी फिरत आहेत. जिल्ह्यात सुटीसाठी राहायला येणारे पर्यटक आहेत, त्याप्रमाणेच एक दिवसात परत फिरणारेही पर्यटक आहेत.
जिल्ह्यात शैक्षणिक सहली
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना नाताळची सुटी आठवडाभर असली तरी अन्य शाळांना मात्र एक दिवसाची सुटी असते. मात्र सध्या शाळेत स्नेहसंमेलन आणि सहलींचे नियोजन होत असते. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणाहून सांगली सातारा नांदेड जालना नाशिक सोलापूर यासारख्या विविध जिल्ह्यांतून शालेय सहली जिल्ह्यात येत आहेत.