Panvel lake news Pudhari
रायगड

Panvel lake news: शास्त्रीय उपायांनंतरही वडाळे सरोवर जलपर्णीच्या विळख्यात

पावसाळ्यात तलावाचे गवताळ प्रदेशात रूपांतर; पालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: वडाळे सरोवरातील जलपर्णीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने मे महिन्यात राबविलेला शास्त्रीय तणनिर्मूलनाचा अभिनव प्रयोग सध्या अपुरा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

जैविक नियंत्रणासाठी तलावात सायंटोबॅगस सल्वीनी या कीटकांचा विसर्ग करण्यात आला होता. या प्रयोगानंतर अवघ्या महिनाभरात जलपर्णीचा रंग बदलल्याने हा प्रयोग यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, पावसाळ्याला सुरुवात होताच जलपर्णीने पुन्हा डोके वर काढले असून, संपूर्ण वडाळे सरोवर हिरव्या गालिच्याने झाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या तलावाकडे पाहिल्यास पाण्याचा मागमूसही लागत नाही. संपूर्ण तलाव गवताळ प्रदेशात बदलल्याचा भास होत असून, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. त्यामुळे जैविक पद्धतीने राबविण्यात आलेल्या तणनिर्मूलन मोहिमेच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

जलपर्णीची झपाट्याने वाढ झाल्यास तलावातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो. तसेच तलावातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलही धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन जलपर्णी हटविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून होत आहे. वडाळे सरोवराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता या समस्येकडे दुर्लक्ष परवडणारे नसल्याचे मतही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT