विश्वास पाटील यांच्यासोबत एक दिवस... pudhari photo
रायगड

विश्वास पाटील यांच्यासोबत एक दिवस...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश केळुसकर

विश्वास पाटील हे राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले लोकप्रिय मराठी लेखक आहेत, हे काही वेगळं सांगायला नको. त्यांच्या पानिपत या कादंबरीनं खरं म्हणजे त्यांची कारकीर्द सुरू झाली. या पानिपतची 50 वी आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल एवढी त्या कादंबरीची प्रचंड लोकप्रियता आहे. “पानिपतावर मराठे हरले असतील पण विश्वास पाटील, तुम्ही मात्र पानिपतावर जिंकलात“, असे उद्गार त्यांचे प्रकाशक दिलीप माजगावकर यांनी पानिपत प्रकाशित झाल्यावर काढले होते.

विश्वास पाटील यांना अत्यंत तरुण वयात झाडाझडतीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि आता ते साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. आपली वाड्.मयीन प्रगती पाटील यांनी स्वतःच्या हिमतीवर केली, त्यामागे त्यांचे लेखनासाठी, संशोधनासाठी, लोकसंपर्कासाठी त्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट कारणीभूत आहेत.

विश्वास पाटील यांच्या संभाजी आणि महानायक या कादंबर्‍या अतिशय लोकप्रिय झाल्या आणि त्यांनी खपाचे उच्चांकही गाठले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रोमहर्षक स्वातंत्र्यलढ्याच्या कहाणीचे महानायक या महामालिकेतून आम्ही आकाशवाणीवर 255 भाग सादर केले आणि त्यांचे प्रसारण लोकांना एवढे आवडले की ती मालिका आठ वेळा पुन्हा पुन्हा प्रसारित करावी लागली. पाटील यांची पांगिरा ही कादंबरीही लोकप्रिय ठरली आणि उत्तराखंडच्या जंगलामधल्या नक्षलवाद्यांवर आधारित दुडिया या कादंबरीलाही खूप वाचकप्रियता मिळाली. त्यांची द ग्रेट कंचना सर्कस ही कादंबरी सध्या गाजते आहे. केवळ कादंबर्‍या लिहून पाटील थांबलेले नाहीत.

अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान हा त्यांचा ग्रंथ अभूतपूर्व यासाठी की अण्णाभाऊ साठेंची जीवन कहाणी यापूर्वी कोणीही सांगितलेली नव्हती. जागतिक गाजलेल्या कादंबर्‍या, चित्रपटांचा पूर्ण धांडोळा घेणारे त्यांचे ‘नॉट गॉन विथ द विंड’ हे पुस्तकही अतिशय लोकप्रिय झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्याची कहाणी पाटील सध्या अनेक भागांत शब्दबद्ध करताहेत. अशा समृद्ध लेखकाची 99व्या अ. भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही औचित्याची व अभिमानाची गोष्ट आहे.

प्रथेप्रमाणे 16 सप्टेंबरला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व अ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे विश्वास पाटील यांचा पहिला सत्कार पुण्यात परिषदेच्या सभागृहात आयोजित केला होता. या सत्कारापूर्वी पाटील यांनी वरळीतील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व संयुक्त महाराष्ट्रासाठी आचार्य अत्रे यांनी केलेल्या लढ्याची कहाणी उपस्थितांपुढे थोडक्यात कथन करून आपल्या नियोजित अध्यक्षीय दौर्‍याचा प्रारंभ केला. त्यानंतर शिवाजी पार्क येथील आचार्य अत्रे यांच्या मूळ निवासस्थानी जाऊन अत्रे साहेबांचे नातू अ‍ॅड. राजेंद्र पै आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच आचार्यांच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर आम्हा काही मित्रांसह चिराग नगर (घाटकोपर) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्व निवासस्थानी विश्वास पाटील यांनी भेट दिली. त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केलं. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यकार अर्जुन डांगळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या आठवणी सांगितल्या.

विश्वास पाटील लिखित अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या पुस्तकातील चिराग नगर संबंधीच्या निवडक भागाचं मी अभिवाचन केलं. विश्वास पाटील यांनी बोलताना, मराठी समीक्षकांनी अण्णाभाऊ साठेंची योग्य दखल घेतली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. तळागाळातील सर्वसामान्यांच्या कथा आणि व्यथा शब्दबद्ध करणारे अण्णाभाऊ साठे हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेचे होते, असं पाटील म्हणाले. आपण अण्णाभाऊ यांना मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, असं त्यांनी आश्वासन दिलं. यावेळी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे संस्थापक आयु. भगवानराव वैराट, रेखा नामदेव साठे, शहाजी थोरात, काशिनाथ गायकवाड, अनिल विष्णू साठे, प्रदीप दयालाल नाथानी व कांतीलाल कडू आणि खूप कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्वास पाटील यांचं आणखी एक श्रद्धास्थान म्हणजे महान कादंबरीकार र. वा. दिघे! खोपोली येथील र. वा. दिघे यांच्या मुलाच्या (वामनराव दिघे) निवासस्थानाला भेट व नंतर खोपोली न. प. ने उभारलेल्या र. वा. दिघे स्मारकाला वंदन असा कार्यक्रम नियोजित होता.“ मी आठवीला असताना र. वा. दिघे यांची सराई कादंबरी वाचली. शेतकर्‍यांच्या व्यथा वेदनांवर आपण लिहिलं पाहिजे, असं लेखनबीज माझ्या मनात रुजलं. र. वा. दिघे हे मराठीतील ग्रेट कादंबरीकार आहेत. त्यांना विसरता येणार नाही, असं मनोगत विश्वास पाटील यांनी वामनराव यांच्या निवासस्थानी र. वां. च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यावर व्यक्त केलं.

र. वा. दिघेंचे सुपुत्र वामनराव, सूनबाई उज्ज्वला व कुटुंबीयांनी त्यांचा सत्कार केला. खोपोलीतील अनेक साहित्यिक यावेळी उपस्थित होते. नंतर दिघे स्मारकात विश्वासरावांनी र. वा. यांच्या भित्तिशिल्पाला पुष्पांजली अर्पण करून वंदन केलं. न.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी विश्वास पाटील यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष मसुरकर व अनेक साहित्यिक उपस्थित होते.

खोपोलीहून मजल दरमजल करत पुण्यात पोहोचलो. तिथं संध्याकाळी राजहंसच्या कार्यालयात पाटील यांचा सत्कार झाला. तेव्हा प्रकाशक माजगावकर यांनी पानिपत कादंबरीच्या निर्मितीची सुरुवात कशी झाली या आठवणी सांगितल्या. तिथून टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात आम्ही पोहोचलो. परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा हृद्य सत्कार केला.

रावसाहेबांनी विश्वासरावांच्या झाडाझडती कादंबरीच्यावेळी त्यांना सरकारी त्रास कसा झाला, त्याबद्दल आठवणी सांगितल्या. यावेळी पूर्व संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मराठी साहित्यातील राजकारणावर जोरदार हल्ला चढवत विश्वास पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्याध्यक्ष व अ.भा. मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी पाटील यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला.

सत्कारा वेळी विश्वास पाटील यांनी पूर्वसूरींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपली निवड बिनविरोध केल्याने महामंडळाच्या सर्व घटक संस्था, पदाधिकार्‍यांचे आभार मानले. “मोबाईलमध्ये फसलेल्या तरुण पिढीला पुन्हा मराठी साहित्याकडे वळवणे, हे अध्यक्षीय वर्षातील प्रमुख उद्दिष्ट राहील”अशी ग्वाही पाटील त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT