रोहे : महादेव सरसंबे
नळ आले पाईप आले, पाणी कधी येणार? घोटभर पाण्यासाठी जीव किती घेणार? अशा घोषणा देत भर तळपत्या उन्हात रोहा तालुक्यातील वैशाली नगर, (बौद्धवाडी) तळाघर येथील महिला आणि ग्रामस्थांनी रोहा तहसीलदार कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढला. रोहा एसटी स्टँड येथून मोर्चाला सुरुवात झाली. फिरोज टॉकीज करीत रोहा तहसिल कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा धडकला. पण, पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा अडवला. त्यानंतर गावातील प्रमुख मंडळींनी तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन दिले. आंदोलकांच्या वतीने यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
रोहा तालुक्यातील २६ गाव पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने आजही पाणी पुरवठा होत आहे. ही घटना ताजी असताना रोहा तालुक्यातील वैशाली नगर, (बौद्धवाडी) तळाघर येथे पाणी टंचाई प्रश्न पुढे आला आहे. तालुक्यात पाणी टंचाई भीषण होत असल्याचे मंगळवारी रोहा तहसीलदार कार्यालयावर वैशाली नगर, (बौद्धवाडी) तळाघर ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चा वरुण दिसून येत आहे. वैशाली नगर, (बौद्धवाडी) तळाघर येथील ग्रामस्थांना गेली १० ते १३ वर्षा पासून पाणी प्रश्न भेडसावत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पाणी प्रश्न संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार केले आहे. परंतु अद्याप त्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात आला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तहसीलदार कार्यालयावर ग्रामस्थांनी मंगळवारी मोर्चा काढला. अनेकादा तक्रार अर्ज देऊनही कागद पुढे जात नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन देण्यात आले. स्वतंत्र पाइपलाइन जोडून पाण्याची व्यवस्था करणे, आमच्यापासून पाणी हिरावून घेणा-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पाण्यासारख्या मुलभूत हक्कापासून गेली १२ वर्षे बौद्धवाडीला वंचित ठेवणा-या प्रशासन यंत्रणेच्या विरोधात आणि पाणी प्रश्न सुटावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.