महाड : महाड नगरपरिषदेच्या 2 डिसेंबर रोजी निवडणुकीदरम्यान उमेदवार अथवा त्यांची संबंधित प्रतिनिधीचा परवाना नसताना युवा कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये जाऊन दडपशाही केली. त्या पश्चात झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तामध्ये असलेले विकास गोगावले हे फरार कसे होऊ शकतात. याचा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी करावा अशी सनसनाटी मागणी शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी आज बनवलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
शिरगाव येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाडमधील कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याबाबत पोलीस यंत्रणा पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. मागील वर्षभरापासून विकास गोगावले यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असून नगरपरिषद निवडणुकीदरम्यानच्या मारहाणीनंतर त्यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांकडून जिल्हा पोलीस यंत्रणेने याबाबतचा अहवाल मागवावा व संबंधित संरक्षक असणाऱ्या पोलिसांना ताब्यात घ्यावे व त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली. पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले 13 दिवसापासून फरार कसे राहू शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अनेक मोठे गुन्हे विकास गोगावले यांच्या नावावरती आहेत, यामध्ये माझ्या स्वतःवरील हल्ला, आंबेडकर कॉलेज प्रकरणादरम्यान आनंदराज आंबेडकर यांच्या हल्ल्याचे प्रकरण, अनिल नवगणे यांच्यावरील हल्ला, महाड मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे संदर्भातील हल्ला यासह 2 डिसेंबरच्या निवडणूक दरम्यान सुशांत जाभरे याच्यावर झालेल्या हल्ल्याची नोंद पाहता विकास गोगावले यांना जिल्हा प्रशासनाने तातडीने रायगड जिल्हा मधून हद्दपार करावे अशी त्यांनी मागणी केली.
नगरपरिषदेतील मारामारी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण सुनावणी करता घेण्यात आली असून या सर्व प्रकरणाची नोंद पोलीस प्रशासनाने न्यायालयासमोर द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी पोलीस यंत्रणेला केली. या पश्चात त्यांना जामीन दिल्यास महाडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था स्थिती धोक्यात येऊ शकते व विकास गोगावले यांच्यामार्फत दहशतीचे वातावरण निर्माण केले जाऊ शकते अशी शक्यता त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
महाड परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महाडचे डी वाय एस पी शंकर काळे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आज तेरा दिवसानंतर ही नगरपरिषद मारहाणी प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे डीवायएसपी काळे यांचे अपयश असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यांच्या असलेल्या जबाबदारीचे त्यांना भान राहिलेले नसून ते ज्या पद्धतीने आता वागत आहेत ते पाहता आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्या देखरेखी खाली येथील निवडणूक सुव्यवस्थेमध्ये होणे शक्य नसल्याने त्यांची तातडीने महाड मधून हकालपट्टी करावी अथवा सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात यावे असे आवाहन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केले.
रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या बद्दल आपल्याला आदर असून महाड नगरपरिषद मारहानीनंतर महाड पोलिसांकडून दाखवण्यात येणारा विलंब केला जात आहे. हे लक्षात घेता महाड मधील पोलीस अधिकाऱ्यांबाबत आपली पूर्ण निराशा झाली आहे असे स्पष्ट केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात आपली कठोर भूमिका बजवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक शांततेत व सुव्यवस्थेत व्हावी यासाठी पोलीस प्रशासन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. याठिकाणी त्या पद्धतीचे अधिकारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना स्पष्ट केले. आपल्या या मागणीनंतरही पोलीस प्रशासनाने विकास गोगावले यांना जामीन नामंजूर करण्याबाबत प्रयत्न केले नाहीत. त्यांना जामीन मिळाल्यास तसेच त्यांची हद्दपारची मागणी न केल्यास आपण न्यायालयात जाऊन या संदर्भात दाद मागण्याचा विचार करीत असल्याचेही पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.