किल्ले रायगड: छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यासाठी भोगलेल्या यातनांपुढे आमची मेहनत काहीच नाही, असे प्रतिपादन छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल यांनी आज (दि.१९) येथे केले. राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे स्वराज्य सप्ताह निमित्ताने किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव व गड परिसराची स्वच्छता व साफसफाई मोहिमेचे आयोजन केले होते. यानिमित्ताने अभिनेता विकी कौशल यांने किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन अभिवादन केले. (Vicky Kaushal visit Raigad)
याप्रसंगी गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. मेघडंबरी परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच होळीचा माळ येथे पारंपरिक ढोलताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष सुरू होता. यावेळी राजसदरेवर मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते विकी कौशल यांचा कवड्यांची माळ व तलवार तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देऊन सन्मान करण्यात आला. (Shiv Jayanti 2025)
याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, वितरक दिनेश विजन, अभिनेता संतोष जुवेकर आदी उपस्थित होते. (Vicky Kaushal visit Raigad)
अनेक वर्षांपासूनची माझी रायगडावर येण्याची इच्छा आज पूर्ण झाली असून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणे हे माझे सौभाग्य समजतो. रयतेचा पहिला राजा म्हणून बहुमान जर कोणाला मिळाला असेल, तर तो छत्रपती शिवरायांना मिळाला आहे. छत्रपती संभाजी राजांचे नुसते पुस्तक वाचून माणसाच्या व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो. आणि मी तर त्यांची संपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यामुळे निश्चितच माझ्या व्यक्तिमत्वात देखील मोठा सकारात्मक बदल झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विकी कौशल रायगडावर येत असल्याचे समजताच किल्ले रायगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 11 वाजता विकी छावा टीमच्या सदस्यांसह हेलिकॉप्टरने रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. रोपे वे ने ही टीम किल्ले रायगडावर दाखल झाली. रोपवेची सेवा पाहून विकी यांनी आपण पुन्हा आपल्या कुटुंबासमवेत गडावर येऊ, असे आश्वासन दिले.