Varandha Ghat ST bus service pudhari photo
रायगड

Varandha Ghat ST bus service : वरंधा घाटातून एसटीबससेवा पूर्ववत करा

वरंध ग्रामस्थांची मागणी; घाट सुस्थितीत असल्याचे महामार्ग विभागाचे एसटी महामंडळाला पत्र

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या व दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा महाड-भोर- पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट पावसाळ्यात दरड प्रवण क्षेत्रासाठी बंद करण्यात आला होता मात्र हा घाट सुस्थितीत असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग महाड यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला दिल्याने या वरंधा घाटातून एसटी बस सेवा पुणे जिल्ह्यासाठी पूर्ववत करावी अशी आग्रही मागणी वरंधा गावातील ग्रामस्थांनी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासह एसटी महामंडळाला केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२१ पासून महाड- भोर- पंढरपूर मार्गावरील वरंधा घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलन होऊन या घाटातून जाणारी एसटी बस सेवा सहित सर्व वाहनांना पावसाळ्यातील कालावधीसाठी येथील वाहतूक बंद करण्याचे निर्देश रायगड जिल्हा अधिकाऱ्यांसह पुणे जिल्हा अधिकाऱ्यांकडून दरवर्षी काढले जातात. तशाच पद्धतीने चालू वर्षी देखील या घाटातील वाहतूक बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यातून महाड-भोर- पंढरपूरकडे जाणारा हा रस्ता वरंधा घाटातील हा रस्ता रायगड जिल्ह्यातील हद्दीपर्यंत सुस्थितीत होता मात्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मात्र काही ठिकाणी या रस्त्याचे रुंदीकरणासाठी चालू असलेल्या कामामुळे डोंगरातून पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने ठराविक अंतरासाठी हा रस्ता बंद झाला होता. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असून कोकणातील गणेशोत्सव हा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.

त्यामुळे हा रस्ता कोकणातील चाकरमान्यांसहित वरंध, माझेरी, पारमाची यासह भोर तालुक्यातील शिरगाव, कुंड, असिंपी, उंबर्डे, साळुंगण, शिळींब या गावातील हजारो नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात दैनंदिन व्यवहारासहित रुग्णसेवेसाठी जाणाऱ्या जनतेला हा रस्ता महत्त्वाचा दुवा असल्याने आता या रस्त्यावरून एसटी बस सेवा पूर्ववत झाल्यास अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरणार असून त्यामुळे या मार्गावरून एसटी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी वरंधा गावातील ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाच्या महाड आगाराकडे तसेच महाडचे आमदार व विद्यमान पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाड येथील उपविभागीय अभियंता यांनी महाड आगार व्यवस्थापक यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की सदर रस्त्याची सद्यस्थिती वाहतुकीस योग्य व समाधानकारक असून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे तसेच आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे सदर मार्गावर नियमित वाहतूक सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही.

  • राजेवाडी वरंध रस्ता एनएच ९६५ डीडीवरील रायगड जिल्हा हद्दीपर्यंत (कावळा किल्ला) या ठिकाणच्या मार्गावर महाड आगारा मार्फत राजेवाडी-वरंध रस्त्यावरील एसटी बस सेवा सुरू करण्यात या कार्यालयाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या दृष्टीने कोणतीही हरकत नाही, असे स्पष्टपणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पत्रात स्पष्ट केले आहे, त्यामुळे या मार्गावरील पुण्यासहित भोर मार्गे जाणारी एसटी वाहतूक सेवा सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याने आता राज्य परिवहन विभाग महाड आगार याबाबत कार्यवाही तातडीने करावी जेणेकरून गणेशोत्सव काळात या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्ववत होईल, अशी मागणी या वरंध गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT