आकर्षक चित्रांमधून जपलं माणसातलं माणूसपण pudhari photo
रायगड

Pune Art Festa : आकर्षक चित्रांमधून जपलं माणसातलं माणूसपण

’पुणे आर्ट फेस्टा’ मध्ये उरणच्या चित्रकाराच्या चार चित्रांची निवड

पुढारी वृत्तसेवा

उरण :राजकुमार भगत

युवा चित्रकार वरद खुशाली विलास यांच्या चार उत्कृष्ट चित्रांची निवड ’पुणे आर्ट फेस्टा’ या प्रतिष्ठित सामूहिक प्रदर्शनासाठी झाली आहे. चित्रांमधून माणसातलं माणूसपण जपण्याचा प्रयत्न वरदने केलेला आहे.

हे प्रदर्शन येत्या 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरी येथे रसिकांसाठी खुले राहणार आहे. बांगिया कला केंद्राच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात वरदच्या तीन व्यक्तीचित्रांचा आणि एका निसर्गचित्राचा समावेश आहे.

वरद खुशाली विलास या युवा कलाकाराने आपल्या नवनिर्मिती आणि सौंदर्यदृष्टीने कॅनव्हासवर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या चित्रांमधून माणसातलं माणूसपण आणि सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ दिसून येतो. ’शहरांच्या पलीकडे’ या त्याच्या चित्र मालिकेतील दोन व्यक्तीचित्रांतून ग्रामीण जीवनाचा खडतर प्रवास आणि त्यातील साधेपणा प्रभावीपणे मांडला आहे. तर, तिसर्‍या व्यक्तीचित्रामध्ये सौंदर्यवतीच्या चेहर्‍यावरील भाव, सोनेरी अलंकार आणि रंगांची अनोखी हाताळणी लक्ष वेधून घेते.

व्यक्तीचित्रणासोबतच निसर्गचित्रणातही वरदने आपली पकड सिद्ध केली आहे. जलरंगातील ’टुवर्ड्स होरीजन’ या मालिकेतील निवड झालेल्या चित्रात विस्तीर्ण क्षितिज, सागरातील गलबत आणि आकाशातील सोनेरी संधीप्रकाशाचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद मिळतो. क्रेलिक, ऑइल आणि जलरंग या तिन्ही माध्यमांवर त्याचे प्रभुत्व दिसून येते.

यापूर्वी, भारतातील सुप्रसिद्ध अशा कर्नाटक चित्रकला परिषद, बंगळूर येथे ’शायनी कलर्स’ आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनातही त्याच्या चित्राची निवड झाली होती. सुप्रसिद्ध चित्रकार विक्रांत शितोळे, आदित्यचारी, प्रफुल सावंत, एम. जी. दोडामणी आणि रश्मी सोनी यांसारख्या मान्यवर परीक्षकांनी त्याच्या कलेला दाद दिली होती.

वरदच्या चित्रांमधील अंगभूत कला, सातत्यपूर्ण सराव आणि व्यक्तिचित्रणावरील पकड पाहून अनेक जाणकार त्याच्यात एक उज्ज्वल भविष्य पाहत आहेत. पुण्यातील कलाप्रेमींना या युवा कलाकाराच्या चित्रांचा आस्वाद घेण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे.

वरद खुशाली विलास

पन्नास स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे

वरदने वयाच्या तेराव्या वर्षीच 50 स्वातंत्र्यसैनिकांची आणि चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची व्यक्तिचित्रे रेखाटून आपल्यातील कलागुणांची चुणूक दाखवली होती. इयत्ता दहावीत असताना त्याने ’वरद कलारंग - रंग आनंदाचे’ या नावाचे आपले पहिले एकल चित्रप्रदर्शनही भरवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT