पनवेल शहर : माणगांवमधील वनवासी कल्याण आश्रम शाळेत बुधवार 6 ऑगस्ट रोजी पिटुकला पण अतिशय रंगीबेरंगी सुंदर असा एक पक्षी आला, त्यामुळे शाळेच्या आवारात मुला मुलींची हा पक्षी पाहण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली.
शाळेचे अधिक्षक विलास देगावकर यांच्या हे लक्षात आले, आदिवासी मुलांची शाळा असल्यामुळे पक्षी प्राणी आणि निसर्ग हे ह्या सर्व मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय, ’देवानंद’ नावाच्या 7 व्या इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शाळेच्या व्हरांड्यात पडलेला हा पक्षी सुरक्षितरित्या हातावर घेऊन देगावकर यांच्याकडे आणला, त्यानंतर शाळेच्या आवारातच ह्या पक्ष्याला त्वरित सोडण्यात आले.
परंतु दुसर्याच दिवशी 7 ऑगस्ट रोजी पुन्हा हा पक्षी शाळेत आल्याने विद्यार्थ्यां-सोबत शिक्षकांमध्येसुद्धा मोठ्या कुतूहलाचा विषय निर्माण झाला, देगावकर यांनी हि गोष्ट ”आमच्या शाळेत शिकण्यासाठी नवीन पिटुकला विद्यार्थी आला आहे, त्याचा आज दुसरा दिवस” असे संबोधत माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना सांगितली.
कुवेसकर यांनी वनवासी कल्याण आश्रम शाळेस त्वरित भेट देत विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या एका खोक्यामध्ये ठेवलेल्या पक्ष्याला बाहेर काढत पाहणी केली असता हा पक्षी कोणत्याही जखमेविना, अतिशय तंदुरुस्त असे तिबोटी खंड्याचे उडू लागलेले पण अपरिपक्व पिल्लू आहे, असे सांगत हे पिल्लू साधारणतः ह्याच मोसमात 15-20 दिवसांपूर्वी घरट्यातून उडून बाहेर पडले असावे, त्याच्या चोचीच्या बदलत्या रंगावरून हे सांगता येते त्यामुळे असा अंदाज वर्तवला व सोबतच त्यांनी रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी असलेल्या ह्या पक्ष्याबद्दलची संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली.
आश्रमशाळेत रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आदिवासी पाडे व गावांमधून आलेले विद्यार्थी शिकत आहेत, भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भूप्रदेशातून हे आदिवासी विद्यार्थी येथे येतात त्यामुळे जंगल परिसराची ह्या विध्यार्थ्यांना चांगलीच ओळख असते, लहानग्या शालेय विद्यार्थ्यांची आपल्या शाळेत अशाप्रकारे पाहुणा आलेल्या या पक्ष्याबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत होती. शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनीच पक्षी राहण्यायोग्य अशा असलेल्या शाळेजवळील नैसर्गिक अधिवासात जाऊन मोकळे सोडताच तिबोटी खंड्याचे हे पिल्लू भरारी घेत स्वैरपणे उडून गेले.त्यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
लहान विद्यार्थ्यांप्रमाणेच निसर्गात देखील एक विद्यार्थीसमान असलेला हा वाढीस लागलेला पिटुकला पक्षीदेखील शाळेत येऊन काहीतरी शिकून आनंदाने आता आयुष्यातल्या त्याच्या पुढच्या प्रवासास उडून गेला असा समज घालत शिक्षकांनी सर्व मुला मुलींना पुन्हा शाळेच्या वर्गात नेले.
यावेळी वनवासी कल्याण आश्रम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पाटील, प्राथमिक शिक्षक काशिनाथ घाणेकर, शिक्षिका मयुरी भगत, अधिक्षक विलास देगावकर, प्रयोगशाळा परिचर दिनेश पारधी देखील सर्व विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.सध्याच्या पावसाळी दिवसात जून ते सप्टेंबर पर्यंत तिबोटी खंड्या या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो, दक्षिणेकडून हे पक्षी मुख्यतः स्थलांतर करून कोकणात तसेच अगदी मुंबई ते गुजरातच्या सीमेपर्यंत उपलब्ध नैसर्गिक आवासांमध्ये येतात, तश्या नोंदी आहेत.
विद्यार्थी सुखावले
माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी रंगीबेरंगी खंड्याची संपूर्ण माहिती दिल्यावर आश्रमशाळेतील सारे विद्यार्थी व शिक्षक सुखावून गेले होते.